७ नोव्हेंबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४७॥
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु । तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ॥ ९२३ ॥
जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया । तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥ ९२४ ॥
फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे । ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटें ॥ ९२५ ॥
तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ॥ ९२६ ॥
आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये तें नोहे । स्नेह कुऱ्हें कीं ॥ ९२७ ॥
येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया । तिया काय कराविया । बाळकें तेणें ? ॥ ९२८ ॥
अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे । परी मीना काय होये । असणें तेथ ॥ ९२९ ॥
पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख । आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥ ९३० ॥
म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें । क्रिया कठोर तऱ्ही तेणें । तेचि करावी ॥ ९३१ ॥
येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलया । पायांचें चालणें डोइया । केलें जैसें ॥ ९३२ ॥
यालागीं कर्म आपुले । जें जातिस्वभावें असे आलें । तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें ॥ ९३३ ॥
आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा । हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥ ९३४ ॥
तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये ? । आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं ॥ ९३५ ॥
सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् । सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८॥
म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु जऱ्ही उपक्रमीं । तरी काय स्वधर्मीं । दोषु । सांगें ? ॥ ९३६ ॥
आगा उजू वाटा चालावें । तऱ्ही पायचि शिणवावे । ना आडरानें धांवावें । तऱ्ही तेंचि ॥
९३७ ॥
पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया । परी जें वाहतां विसांवया । मिळिजे तें घेपे ॥ ९३८ ॥
येऱ्हवीं कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा । जेंचि रंधन श्वान मांसा । तेंचि हवी ॥ ९३९ ॥
दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा । वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक ॥ ९४० ॥
पैं नित्य होम देयावया । कां सैरा आगी सुवावया । फुंकितां धू धनंजया । साहणें तेंचि ॥ ९४१ ॥
परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा ? ॥ ९४२ ॥
हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं । तरी समोरला काई । आगळें न कीजे ? ॥ ९४३ ॥
कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे । तरी स्वपतीतें वायें । सांडिलें कीं । ॥ ९४४ ॥
तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें । तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी ? ॥ ९४५ ॥
वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसुता । जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ॥ ९४६ ॥
येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावे घेऊनि । आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणें ॥ ९४७ ॥
तैसें जाचूनियां इंद्रियें । वेंचूनि आयुष्याचेनि दिये । सांचलें पापीं आन आहे । दुःखावाचूनि ? ॥ ९४८ ॥
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु । उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥ ९४९ ॥
याकारणें किरीटी । स्वधर्माचिये राहाटी । न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा ॥ ९५० ॥
कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥ ९५१ ॥
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा । तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥ ९५२ ॥
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा । भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी ॥ ९५३ ॥
जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें । किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें ॥ ९५४ ॥
मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये । कां जालाही जें लाहे । तें आतां सांगों ॥ ९५५ ॥
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः । नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९॥
तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें । तेथ नातुडे तो वागुरें । वारा जैसा ॥ ९५६ ॥
पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देठु फळें । न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय ॥ ९५७ ॥
पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र । माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें ॥ ९५८ ॥
हें असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती । पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाच्या रिगे ॥ ९५९ ॥
ऐसया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण । न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥ ९६० ॥
तैसें ऐक्याचिये मुठी । माजिवडें चित्त किरीटी । करूनि वेधी नेहटीं । आत्मयाच्या ॥ ९६१ ॥
तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे । आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें ॥ ९६२ ॥
म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासौनि जाय आपैसीं । किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥ ९६३ ॥
पैं अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा । बोधमात्रींचि जीवा । ठावो होय ॥ ९६४ ॥
धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे । नवें तंव नुपकरे । कांहीचि करूं ॥ ९६५ ॥
ऐसीं कर्में साम्यदशा । होय तेथ वीरेशा । मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥ ९६६ ॥
रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं । डोळ्यां तमारी । मिळे जैसा ॥ ९६७ ॥
का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु । श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥ ९६८ ॥
मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा । तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥ ९६९ ॥
तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नासे । तेथ निशीसवें जैसें । आंधारें जाय ॥ ९७० ॥
तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी । त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥ ९७१ ॥
तैसेंचि अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें । ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥ ९७२ ॥
येणें मुळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा जेथ ठावो पुसे । तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे ॥ ९७३ ॥
चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं । आपणयातें काई । काढूं जाइजे ? ॥ ९७४ ॥
तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दुःस्वप्न । जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥ ९७५ ॥
मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ॥ ९७६ ॥
तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें । मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ॥ ९७७ ॥
तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया । म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९७८ ॥
तें आपुलें आपणपें । असे तेंचि होऊनि हारपे । तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा ॥ ९७९ ॥
तैसें न होणें निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे । सर्वसिद्धींत सहजें । परम हेचि ॥ ९८० ॥
देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु । कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥ ९८१ ॥
तैसें आपुलें नेणणें । फेडिजे का जाणणें । तेंहि गिळूनि असणें । ऐसी जे दशा ॥ ९८२ ॥
तियेपरतें कांहीं । निपजणें आन नाहीं । म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते ॥ ९८३ ॥
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे । समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५०॥
परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि । श्रीगुरुकृपालब्धि\- । काळीं पावे ॥ ९८४ ॥
उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु । कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय ॥ ९८५ ॥
तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका । उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ॥ ९८६ ॥
कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां । जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ॥ ९८७ ॥
तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें । द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥
तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें । आकाशा येणें जाणें । आहे काई ? । ॥ ९८९ ॥
म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं । परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ॥ ९९० ॥
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी । वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥ ९९१ ॥
येऱ्हवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं । रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥
पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु । घरीं होय पाइकु । हेंही जालें ॥ ९९३ ॥
इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं । तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥
आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ । घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ॥ ९९५ ॥
ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी । ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥ ९९६ ॥
आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं । तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ॥ ९९७ ॥
परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो ? । कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥
सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें । तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु । तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ॥ १००० ॥
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥ १००१ ॥
तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥ १००२ ॥
परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम । मोक्षाचेंही काम । सरे जेथ ॥ १००३ ॥
यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी । तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥ १००४ ॥
ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे । कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ॥ १००५ ॥
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें । तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं ॥ १००६ ॥
भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं । तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ॥ १००७ ॥
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा । आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ॥ १००८ ॥
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी । जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली ॥ १००९ ॥
तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम । तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ॥ १०१० ॥
No comments:
Post a Comment