अध्याय १८ : ओव्या ५८५-६९८

२६  सप्टेंबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक  २३-२९ / ज्ञानेश्वरी ओव्या  ५८५-६९८ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

नियतं सण्‌गरहितमरागद्वेषतः कृतम् । अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्त्विकमुच्यते ॥ २३॥

तरी स्वाधिकाराचेनि मार्गेंं । आलें जें मानिलें आंगें । पतिव्रतेचेनि परीष्वंगें । प्रियातें जैसें ॥ ५८६ ॥
सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनीं अंजन । तैसें अधिकारासी मंडण । नित्यपणें जें ॥ ५८७ ॥
तें नित्य कर्म भलें । होय नैमित्तिकीं सावाइलें । सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें ॥ ५८८ ॥
आणि आंगा जीवाची संपत्ती । वेंचूनि बाळाची करी पाळती । परी जीवें उबगणें हें स्थिती । न पाहे माय ॥ ५८९ ॥
तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी । उखिती क्रिया पैठी । ब्रह्मींचि करी ॥ ५९० ॥
आणि प्रिय आलिया स्वभावें । शंबळ उरे वेंचे ठाउवें । नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें । पारुषे जरी ॥ ५९१ ॥
तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे । जालियाचेनि आनंदें । फुंजों नेणें ॥ ५९२ ॥
ऐस{ऐ}सिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया । जाण सात्विक हें तया । गुणनाम गा ॥ ५९३ ॥
ययावरी राजसाचें । लक्षण सांगिजेल साचें । न करीं अवधानाचें । वाणेंपण ॥ ५९४ ॥


यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः । क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् ॥ २४॥

तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा । येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा ॥ ५९५ ॥
का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापें सिंतोडा । द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे ॥ ५९६ ॥
तैसी नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें । तयांचेविषयीं न शके । बैसला उठूं ॥ ५९७ ॥
येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें । वेचितांही न मनवे । बहु ऐसें ॥ ५९८ ॥
अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे । पेरितां पुरें न म्हणिजे । बीज जेवीं ॥ ५९९ ॥
कां परीसु आलिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ती । वेचितां ये उन्नती । साधकु जैसा ॥ ६०० ॥
तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें । करी परी तें थोकडें । केलेंही मानी ॥ ६०१ ॥
तेणें फळकामुकें । यथाविधी नेटकें । काम्य कीजे तितुकें । क्रियाजात ॥ ६०२ ॥
आणि तयाही केलियाचें । तोंडीं लावी दौंडीचें । कर्मी या नांवपाटाचें । वाणें सारी ॥ ६०३ ॥
तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु । ते न मनी काळज्वरु । औषध जैसें ॥ ६०४ ॥
तैसेनि साहंकारें । फळाभिलाषियें नरें । कीजे गा आदरें । जें जें कांहीं ॥ ६०५ ॥
परी तेंही करणें बहुवसा । वळघोनि करी सायासा । जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥ ६०६ ॥
एका कणालागीं.ण् उंदिरु । आसका उपसे डोंगरु । कां शेवाळोद्देशें दर्दुरु । समुद्रु डहुळी ॥ ६०७ ॥
पैं भिकेपरतें न लाहे । तऱ्ही गारुडी सापु वाहे । काय कीजे शीणुचि होये । गोडु येकां ॥ ६०८ ॥
हे असो परमाणूचेनि लाभें । पाताळ लंघिती वोळंबे । तैसें स्वर्गसुखलोभें । विचंबणें जें ॥ ६०९ ॥
तें काम्य कर्म सक्लेश । जाणावें येथ राजस । आतां चिन्ह परिस । तामसाचें ॥ ६१० ॥


अनुबन्धं क्षयं हिंसामनपेक्ष्य च पौरुषम् । मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते ॥ २५॥

तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम । निषेधाचें जन्म । सांच जेणें ॥ ६११ ॥
जें निपजविल्यापाठींं । कांहींच न दिसे दिठी । रेघ काढलिया पोटीं । तोयाचे जेवीं ॥ ६१२ ॥
कां कांजी घुसळलिया । कां राखोंडी फुंकलिया । कांहीं न दिसे गाळिलिया । वाळुघाणा ॥ ६१३ ॥
नाना उपणिलिया भूंस । कां विंधिलिया आकाश । नाना मांडिलिया पाश । वारयासी ॥ ६१४ ॥
हें आवघेंचि जैसें । वांझें होऊनि नासे । जें केलिया पाठीं तैसें । वायांचि जाय ॥ ६१५ ॥
येऱ्हवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे । जें कर्म निफजवितां मोडे । जगाचें सुख ॥ ६१६ ॥
जैसा कमळवनीं फांसु । काढिलिया कांटसु । आपण झिजे नाशु । कमळां करी ॥ ६१७ ॥
कां आपण आंगें जळे । आणि नागवी जगाचे डोळे । पतंगु जैसा सळें । दीपाचेनि ॥ ६१८ ॥
तैसें सर्वस्व वायां जावो । वरी देहाही होय घावो । परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणें ॥ ६१९ ॥
माशी आपणयातें गिळवी । परी पुढीला वांती शिणवी । तें कश्मळ आठवी । आचरण जें ॥ ६२० ॥
तेंही करावयो दोषें । मज सामर्थ्य असे कीं नसे । हेंहीं पुढील तैसें । न पाहतां करी ॥ ६२१ ॥
केवढा माझा उपावो । करितां कोण प्रस्तावो । केलियाही आवो । काय येथ ॥ ६२२ ॥
इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पायें । पुसोनियां होये । साटोप कर्मीं ॥ ६२३ ॥
आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही । कां स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी ॥ ६२४ ॥
मग नेणें बहु थोडें । न पाहे मागें पुढें । मार्गामार्ग येकवढें । करीत चाले ॥ ६२५ ॥
तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय तें निश्चित । तामस जाण ॥ ६२६ ॥
ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना । हे केली विवंचना । उपपत्तींसीं ॥ ६२७ ॥
आतां ययाचि कर्मा भजतां । कर्माभिमानिया कर्ता । तो जीवुही त्रिविधता । पातला असे ॥ ६२८ ॥
चतुराश्रमवशें । एकु पुरुषु चतुर्धा दिसे । कर्तया त्रैविध्य तैसें । कर्मभेदें ॥ ६२९ ॥
तरी तयां तिहीं आंतु । सात्विक तंव प्रस्तुतु । सांगेन दत्तचित्तु । आकर्णीं तूं ॥ ६३० ॥


मुक्तसण्‌गोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः । सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उच्यते ॥ २६॥

तरी फळोद्देशें सांडिलिया । वाढती जेवीं सरळिया । शाखा कां चंदनाचिया । बावन्नया ॥ ६३१ ॥
कां न फळतांही सार्थका । जैसिया नागलतिका । तैसिया करी नित्यादिकां । क्रिया जो कां ॥ ६३२ ॥
परी फळशून्यता । नाहीं तया विफळता । पैं फळासीचि पंडुसुता । फळें कायिसी । ॥ ६३३ ॥
आणि आदरें करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे । वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद ॥ ६३४ ॥
तेवींचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा । कर्मकलापु पैं गा । निपजावया ॥ ६३५ ॥
तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें । कां शास्त्रांच्या वातीं पाहणें । क्रियानिर्णयो ॥ ६३६ ॥
वृत्ति करणें येकवळा । चित्त जावों न देणें फळा । नियमांचिया सांखळा । वाहणें सदा ॥ ६३७ ॥
हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगीं । चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां ॥ ६३८ ॥
आणि आत्मयाचिये आवडी । कर्में करितां वरपडीं । देहसुखाचिये परवडीं । येवों न लाहे ॥ ६३९ ॥
आळसा निद्रा दुऱ्हावे । क्षुधा न बाणवे । सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो ॥ ६४० ॥
तंव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक । सोनें जैसें पुटीं तुक । तुटलिया कसीं ॥ ६४१ ॥
जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच । आगीं घालितां रोमांच । देखिजती सतिये । ॥ ६४२ ॥
मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया । देहही सिदतां तया । काय खेदु होईल ? ॥ ६४३ ॥
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जंव जंव देहबुद्धि आटे । तंव तंव आनंदु दुणवटे । कर्मीं जया ॥ ६४४ ॥
ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरीं । तें ठाके ऐसी परी । वाहे जरी ॥ ६४५ ॥
तरी कडाडीं लोटला गाडा । तो आपणपें न मनी अवघडा । तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो कां ॥ ६४६ ॥
नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेलें । तरी तेंही जिंतिलें । मिरवूं नेणें ॥ ६४७ ॥
इया खुणा कर्म करितां । देखिजे जो पंडुसुता । तयातें म्हणिपे तत्त्वतां । सात्विकु कर्ता ॥ ६४८ ॥
आतां राजसा कर्तेया । वोळखणें हें धनंजया । जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो ॥ ६४९ ॥


रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः । हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः ॥ २७॥

जैसा गावींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा । कां स्मशानीं अमंगळा । आघवयांची ॥ ६५० ॥
तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषां । घरटा जाला ॥ ६५१ ॥
म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी ॥ ६५२ ॥
आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी । क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी ॥ ६५३ ॥
कृपणु चित्तीं ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला । बकु जैसा खुतला । मासेयासी ॥ ६५४ ॥
आणि गोंवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी । फळें तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी ॥ ६५५ ॥
तैसें मनें वाचा कायें । भलतया दुःख देतु जाये । स्वार्थु साधितां न पाहे । पराचें हित ॥ ६५६ ॥
तेवींचि आंगें कर्मीं । आचरणें नोहे क्षमी । न निघे मनोधर्मीं । अरोचकु ॥ ६५७ ॥
कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो ॥ ६५८ ॥
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया । तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये ॥ ६५९ ॥
अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें । तरीं शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे ॥ ६६० ॥
कर्मीं राहाटी ऐसी । जयातें होती देखसी । तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता ॥ ६६१ ॥
आतां यया पाठीं येरु । जो कुकर्माचा आगरु । तोही करूं गोचरु । तामस कर्ता ॥ ६६२ ॥


अयुक्तः प्राकृतः स्तब्धः शठो नैष्कृतिकोऽलसः । विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते ॥ २८॥

तरी मियां लागलिया कैसें । पुढील जळत असे । हें नेणिजे हुताशें । जियापरी ॥ ६६३ ॥
पैं शस्त्रें मियां तिखटें । नेणिजे कैसेनि निवटे । कां नेणिजे काळकूटें । आपुलें केलें ॥ ६६४ ॥
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया । आदरी वोखटिया । क्रिया जो कां ॥ ६६५ ॥
तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी । चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा ॥ ६६६ ॥
पैं करणिया आणि जया । मेळु नाहीं धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैंचीं त्राय ? ॥ ६६७ ॥
आणि इंद्रियांचें वोगरिलें । चरोनि राखे जो जियालें । बैलातळीं लागलें । गोचिड जैसें ॥ ६६८ ॥
हांसया रुदना वेळु । नेणतां आदरी बाळु । राहाटे उच्छृंखळु । तयापरी ॥ ६६९ ॥
जो प्रकृती आंतलेपणें । कृत्याकृत्यस्वादु नेणे । फुगे केरें धालेपणें । उकरडा जैसा ॥ ६७० ॥
म्हणौनि मान्याचेनि नांवें । ईश्वराही परी न खालवे । स्तब्धपणें न मनवे । डोंगरासी ॥ ६७१ ॥
आणि मन जयाचें विषकल्लोळीं । राहाटी फुडी चोरिली । दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची ॥ ६७२ ॥
किंबहुना कपटाचें । देहचि वळिलें तयाचें । तें जिणें कीं जुंवाराचें । टिटेघर ॥ ६७३ ॥
नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गांवो । म्हणौनि नये येवों जावों । तया वाटा ॥ ६७४ ॥
आणि आणिकांचें निकें केलें । विरु होय जया आलें । जैसें अपेय पया मिनलें । लवण करी ॥ ६७५ ॥
कां हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणीं धडाडितु । अग्नि होय ॥ ६७६ ॥
नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठीं । होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवीं ॥ ६७७ ॥
तैसें पुढिलाचें बरवें । जयाच्या भीतरीं पावे । आणि विरुद्धचि आघवें । होऊनि निगे ॥ ६७८ ॥
जो गुण घे दे दोख । अमृताचें करी विख ।  दूध पाजलिया देख । व्याळु जैसा ॥ ६७९ ॥
आणि ऐहिकीं जियावें । जेणें परत्रा साच यावें । तें उचित कृत्य पावे । अवसरीं जिये ॥ ६८० ॥
तेव्हां जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी । दुर्व्यवहारीं जैसी । विटाळें लोटे ॥ ६८१ ॥
पैं द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा । कां डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे ॥ ६८२ ॥
तैसा कल्याणकाळु पाहे । तैं तयातें आळसु खाये । ना प्रमादीं तरी होये । तो म्हणे तैसें ॥ ६८३ ॥
जेवींचि सागराच्या पोटीं । जळे अखंड आगिठी । तैसा विषादु वाहे गांठीं । जिवाचिये जो ॥ ६८४ ॥
लेंडोराआगीं धूमावधि । कां अपाना आंगीं दुर्गंधि । तैसा जो जीवितावधि । विषादें केला ॥ ६८५ ॥
आणि कल्पांताचिया पारा । वेगळेंही जो वीरा । सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा ॥ ६८६ ॥
अगा जगाही परौती । शुचा वाहे पैं चित्तीं । करितां विषीं हातीं । तृणही न लगे ॥ ६८७ ॥
ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु । देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता ॥ ६८८ ॥
एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहींचें त्रिधा चिन्ह । दाविलें तुज सुजन । चक्रवर्ती ॥ ६८९ ॥


बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु । प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनञ्जय ॥ २९॥

आतां अविद्येचिया गांवीं । मोहाची वेढूनि मदवी । संदेहाचीं आघवीं । लेऊनि लेणीं ॥ ६९० ॥
आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसां पाहे सावयव । तिये बुद्धीचीही धांव । त्रिधा असे ॥ ६९१ ॥
अगा सत्वादि गुणीं इहीं । कायी एक तिहीं ठायीं । न कीजेचि येथ पाहीं । जगामाजीं ॥ ६९२ ॥
आगी न वसतां पोटीं । कवण काष्ठ असे सृष्टीं । तैसें तें कैंचें दृश्यकोटीं । त्रिविध जें नोहे ॥ ६९३ ॥
म्हणौनि तिहीं गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी । धृतीसिही वांटणी । तैसीचि असे ॥ ६९४ ॥
तेंचि येक वेगळालें । यथा चिन्हीं अळंकारलें । सांगिजैल उपाइलें । भेदलेपणें ॥ ६९५ ॥
परी बुद्धि धृति इयां । दोहीं भागामाजीं धनंंजया । आधीं रूप बुद्धीचिया । भेदासि करूं ॥ ६९६ ॥
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा । प्राणियां येतिया वाटा । तिनी आथी ॥ ६९७ ॥
जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध । संसारभयें सबाध । जीवां ययां ॥ ६९८ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099