अध्याय ९ : ओव्या ३४४-३९७

२६ मे २०१९ निरुपण 
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक २३-२६/ ज्ञानेश्वरी ओव्या ३४४-३९७)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधीपूर्वकम् ॥ २३॥
आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें । जें अग्निइंद्रसूर्यसोमाये । म्हणौनि यजिती ॥ ३४४ ॥
तेही कीर मातेंचि होये । कां जें हें आघवें मीचि आहें । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥ ३४५ ॥
पाहें पां शाखा पल्लव रुखाचें । हे काय नव्हती एकाचि बीजाचें ? । परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥
कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती । आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठायीं ॥ ३४७ ॥
तरि करोनि रससोय बरवी । कानीं केवीं भरावी ? । फुलें आणोनि बांधावीं । डोळां केवीं ? ॥ ३४८ ॥
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा । तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ॥ ३४९ ॥
येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन । म्हणौनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । न तु मामभिजान्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४॥
एर्‍हवीं पाहे पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां । मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ? ॥ ३५१ ॥
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि । कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥ ३५२ ॥
गंगेचें उदक गंगें जैसें । अर्पिजे देवपितरोद्देशें । माझें मज देती तैसें । परि आनानीं भावी ॥ ३५३ ॥
म्हणौनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा । मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥ ३५४ ॥
यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रता । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५॥
मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणीं । ते शरीर जातिये क्षणीं । देवचि जाले ॥ ३५५ ॥
अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें । जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥ ३५६ ॥
कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचि परमदैवतें । जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥ ३५७ ॥
तयां देहाची जवनिका फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली । एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥ ३५८ ॥
मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला । मीचि मनीं भविला । वानिला वाचा ॥ ३५९ ॥
सर्वांगीं सर्वांठायीं । मीचि नमस्करिला जिहीं । दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरां ॥ ३६० ॥
जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतबाहेरि मियांचि धाले । जयांचें जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥ ३६१ ॥
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं । जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें ॥ ३६२ ॥
जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम । जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥ ३६३ ॥
जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडें जयांचेनि मंत्रें । ऐसें जे चेष्टामात्रें । भजले मज ॥ ३६४ ॥
ते मरणा ऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे । मग मरणीं आणिकीकडे । जातील केवीं ? ॥ ३६५ ॥
म्हणौनि मद्याजी जे जाहाले । ते माझियाचि सायुज्या आले । जिहीं उपचारमिषें दिधलें । आपणपें मज ॥ ३६६ ॥
पैं अर्जुना माझे ठायीं । आपणपेंवीण सौरसु नाहीं । मी उपचारें कवणाही । नाकळें गा ॥ ३६७ ॥
एथ जाणीव करी तोचि नेणें । आथिलेंपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥
अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥ ३६९ ॥
पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदांपासूनि असे आगळें ? । कीं शेषाहूनि तोंडाळें । बोलकें आथी ? ॥ ३७० ॥
तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणौनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥ ३७१ ॥
करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजे शूळपाणी । तोही अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥ ३७२ ॥
नातरी आथिलेपणें सरिशी । कवणी आहे लक्ष्मिये ऐसी ? । श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥ ३७३ ॥
तिया खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरी ठेविलीं । तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं ? ॥ ३७४ ॥
तिया नावडोनि जेव्हां मोडिती । तेव्हां महेंद्राचे रंक होती । तिया झाडा जेउते पाहती । ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥
ऐसिया जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरींचिया पाइका । ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥ ३७६ ॥
मग सर्वस्वें करूनि सेवा । अभिमानु सांडूनि पांडवा । ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥ ३७७ ॥
म्हणौनि थोरपण पर्‍हां सांडिजे । एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे । जैं जगा धाकुटें होईजे । तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥
अगा सहस्रकिरणांचिये दिठी- । पुढां चंद्रही लोपे किरीटी । तेथ खद्योत कां हुटहुटी । आपुलेनि तेजें ? ॥ ३७९ ॥
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे ।तेथ येर प्राकृत हेंदरें । केवीं जाणों लाहे ? ॥ ३८० ॥
यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळ गुणांचें लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६॥

मग निस्सीमभाव उल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें । फळ आवडे तैसें । भलतयाचें हो ॥ ३८२ ॥
भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्हीं हात वोडवीं । मग देंठु न फेडितां सेवीं । आदरेंशी ॥ ३८३ ॥
पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें । तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥
हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें । तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥ ३८५ ॥
परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखें । तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥ ३८६ ॥
अथवा ऐसेंहीं एक घडे । जे पालाही परी न जोडे । तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं ? ॥ ३८७ ॥
तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें । तेंचि सर्वस्व करूनि अर्पिलें । जेणें मज ॥ ३८८ ॥
तेणें वैकुंठांपासोनि विशाळें । मजलागीं केली राऊळें । कौस्तुभाहोनि निर्मळें । लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥
दुधाचीं सेजारें । क्षीराब्धी ऐसीं मनोहरें । मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥
कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु । मज हातीवा लाविला दिनकरु । दीपमाळे ॥ ३९१ ॥
गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतरूंचीं उद्यानें । कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥
मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिली बहुवसें । ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा ॥ ३९३ ॥
हें सांगावें काय किरीटी । तुवांचि देखिलें आपुलिया दिठी । मी सुदामाचिया सोडीं गांठीं । पव्हयांलागीं ॥ ३९४ ॥
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ ३९५ ॥
येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ । वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ ३९६ ॥
म्हणौनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धी एकी सोपारी करीं । तरि सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥ ३९७ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099