अध्याय ११ : ओव्या १६५-२५४

१० नोव्हेंबर २०१९ निरुपण 
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक ९-१४ / ज्ञानेश्वरी ओव्या १६५-२५४)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
ह्या भागाचे पूर्ण रेकॉर्डिंग झालेले नाही. 

संजय उवाच ।
एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः । दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ९॥
पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती । जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ? ॥ १६५ ॥
ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं । ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी ॥ १६६ ॥
हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे । अनुसरलें गरुडा{ऐ}सें । कवण आहे ? ॥ १६७ ॥
परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें । जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥ १६८ ॥
परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना । कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥ १६९ ॥
पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले । कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ॥ १७० ॥
आजि हें परब्रह्म सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे । कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥ १७१ ॥
हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये । नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥ १७२ ॥
एर्‍हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले । ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥ १७३ ॥
हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन । यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ १७४ ॥
तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा । श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥ १७५ ॥
म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों । जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥ १७६ ॥
ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें । तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥ १७७ ॥
तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका । अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥
मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला । ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥ १७९ ॥
हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ । विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥
जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे । आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥ १८१ ॥
मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती । तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला ॥ १८२ ॥
मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें । चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥ १८३ ॥
ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें । आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों ॥ १८४ ॥
तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया । आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो ॥ १८५ ॥
एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें । चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥ १८६ ॥
जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं । तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे ॥ १८७ ॥
म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें । तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं ? ॥ १८८ ॥
दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले । चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥ १८९ ॥
नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे । तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥
तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें । इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥ १९१ ॥
तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले । जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥ १९२ ॥
तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें । तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥ १९३ ॥
जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे । तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥ १९४ ॥
प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन । सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ॥ १९५ ॥
इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा । तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥ १९६ ॥

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् । अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १०॥
मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें । नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥
कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली । तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें ॥ १९८ ॥
तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें । काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥ १९९ ॥
कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं । कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥ २०० ॥
तैसीं अद्‍भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें ।आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥
पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके । मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥ २०२ ॥
तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें । डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥ २०३ ॥
तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी । तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥
हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता । दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥ २०५ ॥
मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें । ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥ २०६ ॥
तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा । काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती ? ॥ २०७ ॥
ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? । म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥ २०८ ॥
जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे । अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥ २०९ ॥
चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी । जे नाना रत्‍न अळंकारीं । मिरवत असे ॥ २१० ॥
परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें । तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥ २११ ॥
जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा । जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥ २१२ ॥
तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु । देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥ २१३ ॥
मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा । तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१४ ॥
आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार । आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें ॥ २१५ ॥
जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे ।तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥
मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें । तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥ २१७ ॥
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् । सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११॥
कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी । तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली ॥ २१८ ॥
जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे । तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥
मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक । कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥ २२० ॥
स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें । तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥ २२१ ॥
श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला । नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥
जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली । तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥
जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे । जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥ २२४ ॥
जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी । तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥ २२५ ॥
ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा । तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥ २२६ ॥
बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे । मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥
अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके । तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥ २२८ ॥
अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? । परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥ २२९ ॥
कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें । तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥
म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी । तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥ २३१ ॥
तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें । कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥ २३२ ॥
तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें । प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥ २३३ ॥
आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे । तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥ २३४ ॥
म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी । हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥ २३५ ॥
म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें । नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥ २३६ ॥
दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥
तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा । कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥
तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं । तर्‍ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ॥ २३८ ॥
आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे । तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥ २३९ ॥
तर्‍ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें । आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥
ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज । तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥
तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा  । अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥ १३॥
आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें । जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती ॥ २४२ ॥
कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर । नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥ २४३ ॥
विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं । अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥ २४४ ॥
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः । प्रणम्य शिरसा देवं कृताझ्जलिरभाषत ॥ १४॥
तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण । तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥ २४५ ॥
आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥ २४६ ॥
वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले ॥ २४७ ॥
शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥ २४८ ॥
माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे । तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ २४९ ॥
कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती ॥ २५० ॥
उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे ॥ २५१ ॥
ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥ २५२ ॥
तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥ २५३ ॥
तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिया कडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥ २५४ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099