अध्याय १८ : ओव्या ५२९-५८५

 १९ सप्टेंबर २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ( श्लोक  २०-२२ / ज्ञानेश्वरी ओव्या  ५२९- ५८५ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.   

सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते । अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्त्विकम् ॥ २०॥

तरी अर्जुना गा तें फुडें । सात्विक ज्ञान चोखडें । जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसीं ॥ ५२९ ॥
जैसा सूर्य न देखे अंधारें । सरिता नेणिजती सागरें । कां कवळिलिया न धरे । आत्मछाया ॥ ५३० ॥
तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती ॥ ५३१ ॥
जैसें हातें चित्र पाहातां । होय पाणियें मीठ धुतां । कां चेवोनि स्वप्ना येतां । जैसें होय ॥ ५३२ ॥
तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें । जाणता ना जाणणें । जाणावें उरे ॥ ५३३ ॥
पैं सोनें आटूनि लेणीं । न काढिती आपुलिया आयणी । कां तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसें ॥ ५३४ ॥
तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा । तें ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा ॥ ५३५ ॥
आरिसा पाहों जातां कोडें । जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें । तैसें ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जें ॥ ५३६ ॥
पुढती तेंचि सात्विक ज्ञान । जें मोक्षलक्ष्मीचें भुवन । हें असो ऐक चिन्ह । राजसाचें ॥ ५३७ ॥


पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान्पृथग्विधान् । वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ञानं विद्धि राजसम् ॥ २१॥

तरी पार्था परीयेस । तें ज्ञान गा राजस । जें भेदाची कांस । धरूनि चाले ॥ ५३८ ॥
विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया । बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें ॥ ५३९ ॥
जैसें साचा रूपाआड । घालूनि विसराचें कवाड । मग स्वप्नाचें काबाड । ओपी निद्रा ॥ ५४० ॥
तैसें स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या महीं खळीं । तिहीं अवस्थांचिया वह्याळी । दावी जें जीवा ॥ ५४१ ॥
अलंकारपणें झांकलें । बाळा सोनें कां वायां गेलें । तैसें नामीं रूपीं दुरावलें । अद्वैत जया ॥ ५४२ ॥
अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां । वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं ॥ ५४३ ॥
कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे । नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र ॥ ५४४ ॥
तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना । ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली ॥ ५४५ ॥
मग इंधनीं भेदला अनळु । फुलांवरी परीमळु । कां जळभेदें शकलु । चंद्रु जैसा ॥ ५४६ ॥
तैसें पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष । आंतलें तें राजस । ज्ञान येथ ॥ ५४७ ॥
आतां तामसाचेंही लिंग । सांगेन तें वोळख चांग । डावलावया मातंग\- । सदन जैसें ॥ ५४८ ॥

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्कार्ये सक्तमहैतुकम् । अतत्त्वार्थवदल्पं च तत्तामसमुदाहृतम् ॥ २२॥

तरी किरीटी जें ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन । श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया ॥ ५४९ ॥
येरींही शास्त्र बटिकरीं । जें निंदेचे विटाळवरी । बोळविलेंसे डोंगरीं । म्लेंच्छधर्माच्या ॥ ५५० ॥
जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें । घेतलें भवें पिसें । होऊनियां ॥ ५५१ ॥
जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे । निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ॥ ५५२ ॥
तया तोंडीं जें नाडळे । कां खातां जेणें पोळे । तेंचि येक वाळे । येर घेणेचि ॥ ५५३ ॥
पैं सोनें चोरितां उंदिरु । न म्हणे थरुविथरु । नेणे मांसखाइरु । काळें गोरें ॥ ५५४ ॥
नाना वनामाजीं बोहरी । कडसणी जेवीं न करी । कां जीत मेलें न विचारी । बैसतां माशी ॥ ५५५ ॥
अगा वांता कां वाढिलेया । साजुक कां सडलिया । विवेकु कावळिया । नाहीं जैसा ॥ ५५६ ॥
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें । कां विहित आदरें घ्यावें । हें विषयांचेनि नांवें । नेणेंचि जें ॥ ५५७ ॥
जेतुलें आड पडे दिठी । तेतुलें घेचि विषयासाठीं । मग तें स्त्री\-द्रव्य वाटी । शिश्नोदरां ॥ ५५८ ॥
तीर्थातीर्थ हे भाख । उदकीं नाहीं सनोळख । तृषा वोळे तेंचि सुख । वांचूनियां ॥ ५५९ ॥
तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य । तोंडा आवडे तें मेध्य । ऐसाचि बोधु ॥ ५६० ॥
आणि स्त्रीजात तितुकें । त्वचेंद्रियेंचि वोळखे । तियेविषयीं सोयरिकें । एकचि बोधु ॥ ५६१ ॥
पैं स्वार्थीं जें उपकरे । तयाचि नाम सोयिरें । देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानीं ॥ ५६२ ॥
मृत्यूचें आघवेंचि अन्न । आघवेंचि आगी इंधन । तैसें जगचि आपलें धन । तामसज्ञाना ॥ ५६३ ॥
ऐसेनि विश्व सकळ । जेणें विषयोचि मानिलें केवळ । तया एक जाण फळ । देहभरण ॥ ५६४ ॥
आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा । तैसें कृत्यजात उदरा\- । लागिंचि बुझे ॥ ५६५ ॥
वांचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती । इये आघवियेचि राती । जाणिवेची जें ॥ ५६६ ॥
जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा । ययापरौती प्रमा । ढळों नेणें ॥ ५६७ ॥
म्हणे पडिलेनि शरीरें । केलेनिसीं आत्मा सरे । मा भोगावया उरे । कोण वेषें । ॥ ५६८ ॥
ना ईश्वरु पाहातां आहे । तो भोगवी हें जरी होये । तरी देवचि खाये । विकूनियां ॥ ५६९ ॥
गांवींचें देवळेश्वर । नियामकचि होती साचार । तरी देशींचे डोंगर । उगे कां असती ? ॥ ५७० ॥
ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे । आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि ॥ ५७१ ॥
येरें पापपुण्यादिकें । तें आघवेंचि करोनि लटिकें । हित मानी अग्निमुखे । चरणें जें कां ॥ ५७२ ॥
जें चामाचे डोळे दाविती । जें इंद्रियें गोडी लाविती । तेंचि साच हे प्रतीती । फुडी जया ॥ ५७३ ॥
किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था । धूमाची वेली वृथा । आकाशीं जैसी ॥ ५७४ ॥
कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला । तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा ॥ ५७५ ॥
नाना उंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें । वन लागलें जैसें । साबरीचें ॥ ५७६ ॥
नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन । अथवा गळास्तन । शेळियेचे ॥ ५७७ ॥
तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें । तयातें मी म्हणें । तामस ज्ञान ॥ ५७८ ॥
तेंही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा । जात्यंधाचा कां जैसा । डोळा वाडु ॥ ५७९ ॥
कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान । तैसें आडनांव ज्ञान । तामसा तया ॥ ५८० ॥
हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें । तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम ॥ ५८१ ॥
एवं तिहीं गुणीं । भेदलें यथालक्षणीं । ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविलें तुज ॥ ५८२ ॥
आतां याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा । प्रकाशें होती गोचरा । कर्तयांच्या क्रिया ॥ ५८३ ॥
म्हणौनि कर्म पैं गा । अनुसरे तिहीं भागां । मोहरे जालिया वोघा । तोय जैसे ॥ ५८४ ॥
तेंचि ज्ञानत्रयवशें । त्रिविध कर्म जें असे । तेथ सात्विक तंव ऐसें । परीसे आधीं ॥ ५८५ ॥



No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099