अध्याय १० : ओव्या २४-७३

४ ऑगस्ट  २०१९ निरुपण 
अध्याय १० : विभूतीयोगः (गीता श्लोक १-२ / ज्ञानेश्वरी ओव्या २४-७३)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥ २४ ॥
तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें । पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥ २५ ॥
तेचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवट । होती जेणें ॥ २६ ॥
तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जे गती । तें आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठीं ॥ २७ ॥
तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । करूनि भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चार्‍ही ॥ २८ ॥
पाठीं सप्तप्रश्नविधि । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी । एवं सकळ वाक्यावधि । अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥
मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥ ३० ॥
तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मग मी वायां । गर्व कां करूं ? ॥ ३२ ॥
अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥ ३३ ॥
एक जाणोनियां बोलती । एक ठायें ठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥ ३४ ॥
हें ऐसें अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥
अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली । एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥
एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं चुळींचि सागरातें भरिलें । तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥
परि हें असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैसे । राम रावण जैसे । मीनले समरीं ॥ ३८ ॥
तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें । या निवाडा तत्त्वज्ञु जाणें । जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥
एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले । आतां उत्तरखंड उवाइलें । ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥
जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥
देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ॥ ४२ ॥
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मर्‍हाठी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें । तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥ ४४ ॥
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ॥ ४५ ॥
उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥ ४६ ॥
तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥ ४७ ॥
जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥ ४८ ॥
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि ॥ ४९ ॥
श्रीभगवानुवाच ।
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः । यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १॥
आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तवं टाचें नव्हें भलें । पुरतें आहे ॥ ५० ॥
घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे । ऐसा परिसौनि पाहिलासि तवं परिसविजे । ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा किरीटी तूं आतां माझें । निजधाम कीं ॥ ५२ ॥
ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें । गिरी देखोनि सुभरें । मेघु जैसा ॥ ५३ ॥
तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥ ५४ ॥
पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे । यालागीं नुबगिजे । वाहो करितां ॥ ५५ ॥
पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता । म्हणौनि सोनें पंडुसुता । शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥
तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती ॥ ५७ ॥
जैसें बाळका लेवविजे लेणें । तया शृंगारा बाळ काइ जाणे ? । परि ते सुखाचे सोहळे भोगणें । माउलिये दिठी ॥ ५८ ॥
तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे । तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें आहे ॥ ५९ ॥
आतां अर्जुना असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे ॥ ६० ॥
आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि, तें तुजशीं बोलणें । परि असो हें अंतःकरणें । अवधान देईं ॥ ६१ ॥
तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें, परम । जें अक्षरें लेऊनी परब्रह्म । तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥
परी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें । तरि तो गा जो मी एथें । तें विश्वचि हें ॥ ६३ ॥
न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ २॥

एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी जेथ ॥ ६४ ॥
अगा उदरींचा गर्भु जैसा । न देखें आपुलिये मातेची वयसा । मी आघवेया देवां तैसा । नेणवे कांहीं ॥ ६५ ॥
आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवेचि गगन । तेवीं महर्षींचें ज्ञान । न देखेचि मातें ॥ ६६ ॥
मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला । या निरुती करितां बोला । कल्प गेले ॥ ६७ ॥
कां जे महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां । मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणतां ॥ ६८ ॥
उतरलें उदक पर्वत वळघे । जरी झाड वाढत मुळीं लागे । तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मातें ॥ ६९ ॥
कां गाभेवनें वटु गिंवसवे । जरी तरंगीं सागरू सांठवे । कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा ॥ ७० ॥
तरी मियां जालिया जीवां । महर्षीं अथवा देवां । मातें जाणावया होआवा । अवकाशु गा ॥ ७१ ॥
ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये । सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो ॥ ७२ ॥
प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूतांचिया चढे । माथयावरी ॥ ७३ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099