२९ नोव्हेंबर २०२० निरुपण
पैं हरूनि कफवात । जैं देही आटोपे पित्त । तैं करी संतप्त । देह जेवीं ॥ १९६ ॥
कां वरिष आतप जैसें । जिणौनि शीतचि दिसे । तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें ॥ १९७ ॥
नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती । तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय ॥ १९८ ॥
तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी । तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी ? ॥ १९९ ॥
तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज । वळघें तैं सहज । प्रमादीं होय ॥ २०० ॥
तयाचि गा परिपाठीं । सत्त्व तमातें पोटीं । घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ॥ २०१ ॥
तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन गोमटें नाहीं । ऐसें मानी देहीं । देहराजु ॥ २०२ ॥
त्रिगुण वृद्धि निरूपण । तीं श्लोकीं सांगितलें जाण । आतां सत्त्वादि वृद्धिलक्षण । सादर परियेसीं ॥ २०३ ॥
पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इयें । वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती ॥ २०४ ॥
जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती बाहेरी वोसंडें । वसंतीं पद्मखंडें । दृती जैसी ॥ २०५ ॥
सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी । साचचि करचरणीं । होती डोळे ॥ २०६ ॥
राजहंसापुढें । चांचूचें आगरडें । तोडी जेवीं झगडे । क्षीरनीराचे ॥ २०७ ॥
तेवीं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखीं । नियमु बा रे पायिकी । वोळगे तैं ॥ २०८ ॥
नाइकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी । अवाच्य तें टाळी । जीभचि गा ॥ २०९ ॥
वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें । निषिद्ध इंद्रियां तैसें । समोर नोहे ॥ २१० ॥
धाराधरकाळें । महानदी उचंबळे । तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं ॥ २११ ॥
अगा पुनवेच्या दिवशीं । चंद्रप्रभा धांवें आकाशीं । ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ ॥ २१२ ॥
वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे । मानस विटे । विषयांवरी ॥ २१३ ॥
एवं सत्त्व वाढे । तैं हें चिन्ह फुडें ।आणि निधनही घडे । तेव्हांचि जरी ॥ २१४ ॥
कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें । पडियंतें पाहुणें । स्वर्गौनियां ॥ २१५ ॥
तरी जैसीचि घरींची संपत्ती । आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती । मा परत्रा आणि कीर्ती । कां नोहावें ? ॥ २१६ ॥
मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया । तेवीं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा ? ॥ २१७ ॥
जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट । निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ॥ २१८ ॥
अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये । किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं ॥ २१९ ॥
सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा । गेलिया अपुरा । होय काई ? ॥ २२० ॥
नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा । तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं ॥ २२१ ॥
तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी । तरंगावों लागें बुद्धी । विवेकावरी ॥ २२२ ॥
पैं महदादि परिपाठीं । विचारूनि शेवटीं । विचारासकट पोटीं । जिरोनि जाय ॥ २२३ ॥
छत्तिसां सदतिसावें । चोविसां पंचविसावें । तिन्ही नुरोनि स्वभावें । चतुर्थ जें ॥ २२४ ॥
ऐसें सर्व जें सर्वोत्तम । जालें असे जया सुगम । तयासवें निरुपम । लाहे देह ॥ २२५ ॥
इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख । बैसोनि जैं आगळीक । धरी रज ॥ २२६ ॥
आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचा । माजवी तैं चिन्हांचा । उदयो ऐसा ॥ २२७ ॥
पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेंटाळी । तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय ॥ २२८ ॥
परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ॥ २२९ ॥
हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । वेंटाळितां अलाभु । तें तें उरे ॥ २३० ॥
आणि आड पडलिया । उद्यमजाती भलतिया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥ २३१ ॥
तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥ २३२ ॥
नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं । महावनें लावावीं । नानाविधें ॥ २३३ ॥
ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं । आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे ॥ २३४ ॥
सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसें अभिलषीं जोडे । दुर्भरत्व ॥ २३५ ॥
स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायांतळीं ॥ २३६ ॥
इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं । आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह ॥ २३७ ॥
तरी आघवाचि इहीं । परिवारला आनी देहीं । रिगे परी योनिही । मानुषीचि ॥ २३८ ॥
सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं । तरी काय अवधारीं । रावो होईल ? ॥ २३९ ॥
बैल तेथें करबाडें । हें न चुके गा फुडें । नेईजो कां वर्हाडें । समर्थाचेनी ॥ २४० ॥
म्हणौनि व्यापारा हातीं । उसंतु दिहा ना राती । तैसयाचिये पांती । जुंपिजे तो ॥ २४१ ॥
कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं । जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥ २४२ ॥
मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती । गिळूनि ये उन्नती । तमोगुण ॥ २४३ ॥
तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें । तियें परिस चांगें । श्रोत्रबळें ॥ २४४ ॥
तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन । रात्रींचें कां गगन । अंवसेचिये ॥ २४५ ॥
तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस । विचाराची भाष । हारपे तैं ॥ २४६ ॥
बुद्धि मेचवेना धोंडीं । हा ठायवरी मवाळें सांडी । आठवो देशधडी । जाला दिसे ॥ २४७ ॥
अविवेकाचेनि माजें । सबाह्य शरीर गाजे । एकलेनि घेपे दीजे । मौढ्य तेथ ॥ २४८ ॥
आचारभंगाचीं हाडें । रुपतीं इंद्रियांपुढें । मरे जरी तेणेंकडे । क्रिया जाय ॥ २४९ ॥
पैं आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे । आंधारी देखणें जैसें । डुडुळाचें ॥ २५० ॥
तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे । तियेविषयीं धांवे । घेती करणें ॥ २५१ ॥
मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे । निष्प्रेमेंचि भुले । पिसें जैसें ॥ २५२ ॥
चित्त तरी गेलें आहे । परी उन्मनी ते नोहे । ऐसें माल्हातिजे मोहें । माजिरेनि ॥ २५३ ॥
किंबहुना ऐसैसीं । इयें चिन्हें तम पोषीं । जैं वाढे आयितीसी । आपुलिया ॥ २५४ ॥
आणि हेंचि होय प्रसंगें । मरणाचें जरी पडे खागें । तरी तेतुलेनि निगे । तमेंसीं तो ॥ २५५ ॥
राई राईपण बीजीं । सांठवूनियां अंग त्यजी । मग विरूढे तैं दुजी । गोठी आहे ? ॥ २५६ ॥
पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां । कां जेथ लागे तेथ असका । तोचि आहे ॥ २५७ ॥
म्हणौनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें । देह जाय तैं मागौतें । तमाचेचि होय ॥ २५८ ॥
आतां काय येणें बहुवे । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे । तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी ॥ २५९ ॥
No comments:
Post a Comment