९ जानेवारी २०२२ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं । सूर्यु नव्हें लक्ष्मीपती । वक्त्राकाशींचा ॥ १४७१ ॥
बाप कुळ तें पवित्र । जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र । जेणें गीता केलें शास्त्र । आवारु जगा ॥ १४७२ ॥
हें असो मग तेणें । सद्गुरु श्रीकृष्णें । पार्थाचें मिसळणें । आणिलें द्वैता ॥ १४७३ ॥
पाठीं म्हणतसे पांडवा । शास्त्र हें मानलें कीं जीवा । तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा ॥ १४७४ ॥
तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया । परी जोडिलें भोगावया । विपायें होय ॥ १४७५ ॥
पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें । सुरां असुरां केवढें । मथितां जालें ॥ १४७६ ॥
तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें । परी वरिचिली चुकलें । जतनेतें ॥ १४७७ ॥
तेथ अमरत्वा वोगरिलें । तें मरणाचिलागीं जालें । भोगों नेणतां जोडलें । ऐसें आहे ॥ १४७८ ॥
नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटीं भांबावला । तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ? ॥ १४७९ ॥
म्हणौनि बहुत पुण्य तुवां । केलें तेणें धनंजया । आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो ॥ १४८० ॥
तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदायें पांघुरौनि । शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठीं हो ॥ १४८१ ॥
येऱ्हवीं अमृतमंथना\- । सारिखें होईल अर्जुना । जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेंवीण ॥ १४८२ ॥
गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी । जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची ॥ १४८३ ॥
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे । परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया ॥ १४८४ ॥
म्हणौनि शास्त्रीं जो इये । उचितु संप्रदायो आहे । तो ऐक आतां बहुवें । आदरेंसीं ॥ १४८५ ॥
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ॥ ६७॥
तरी तुवां हें जें पार्था । गीताशास्त्र लाधलें आस्था । तें तपोहीना सर्वथा । सांगावें ना हो ॥ १४८६ ॥
अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्तीं जो ढिला । तो वेदीं अंत्यजु वाळिळा । तैसा वाळीं ॥ १४८७ ॥
नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा । गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना ॥ १४८८ ॥
कां तपही जोडे देहीं । भजे गुरुदेवांच्या ठायीं । परी आकर्णनीं नाहीं । चाड जरी ॥ १४८९ ॥
तरी मागील दोन्हीं आंगीं । उत्तम होय कीर जगीं । परी या श्रवणालागीं । योग्यु नोहे ॥ १४९० ॥
मुक्ताफळ भलतैसें । हो परी मुख नसे । तंव गुण प्रवेशे । तेथ कायी ? ॥ १४९१ ॥
सागरु गंभीरु होये । हें कोण ना म्हणत आहे । परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ ॥ १४९२ ॥
धालिया दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें । तें आर्तीं कां न करावें । उदारपण ॥ १४९३ ॥
म्हणौनि योग्य भलतैसें । होतु परी चाड नसे । तरी झणें वानिवसें । देसी हें तयां ॥ १४९४ ॥
रूपाचा सुजाणु डोळा । वोढवूं ये कायि परिमळा ? । जेथ जें माने ते फळा । तेथचि ते गा ॥ १४९५ ॥
म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती । परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती । वाळावेचि ते ॥ १४९६ ॥
नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणीं आर्ति । आथी ऐसीही आयती । देखसी जरी ॥ १४९७ ॥
तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता । तया मातें सामान्यता । बोलेल जो ॥ १४९८ ॥
माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें । येक आहाती तयांतें । योग्य न म्हण ॥ १४९९ ॥
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी । दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी ॥ १५०० ॥
अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें । परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं ॥ १५०१ ॥
सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर । परी सर्पांगना द्वार । रुंधलें आहे ॥ १५०२ ॥
निपजे दिव्यान्न चोखट । परी माजीं काळकूट । असो मैत्री कपट\- । गर्भिणी जैसी ॥ १५०३ ॥
तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा । जो माझयांची कां निंदा । माझीचि करी ॥ १५०४ ॥
याकारणें धनंजया । तो भक्तु मेधावीं तपिया । तरी नको बापा इया । शास्त्रा आतळों देवों ॥ १५०५ ॥
काय बहु बोलों निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा । गीता हे कवतिका\- । लागींही नेदीं ॥ १५०६ ॥
म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळीं दाटोनि गाडोरा । वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला ॥ १५०७ ॥
आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा । वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा ॥ १५०८ ॥
य इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति । भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ॥ ६८॥
ऐशा भक्तालयीं चोखटीं । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं । मग माझिया संवसाटी । तुकसी जगीं ॥ १५०९ ॥
कां जे एकाक्षरपणेंसीं । त्रिमात्रकेचिये कुशीं । प्रणवु होतां गर्भवासीं । सांकडला ॥ १५१० ॥
तो गीतेचिया बाहाळींं । वेदबीज गेलें पाहाळी.ण् । कीं गायत्री फुलींफळीं । श्लोकांच्या आली ॥ १५११ ॥
ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता । अनन्यजीवना माता । बाळका जैसी ॥ १५१२ ॥
तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं । तो देहापाठीं मजसीं । येकचि होय ॥ १५१३ ॥
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः । भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥ ६९॥
आणि देहाचेंही लेणें । लेऊनि वेगळेपणें । असे तंव जीवेंप्राणें । तोचि पढिये ॥ १५१४ ॥
ज्ञानियां कर्मठां तापसां । यया खुणेचिया माणुसां\- । माजीं तो येकु गा जैसा । पढिये मज ॥ १५१५ ॥
तैसा भूतळीं आघवा । आन न देखे पांडवा । जो गीता सांगें मेळावा । भक्तजनांचा ॥ १५१६ ॥
मज ईश्वराचेनि लोभें । हे गीता पढतां अक्षोभें । जो मंडन होय सभे । संतांचिये ॥ १५१७ ॥
नेत्रपल्लवीं रोमांचितु । मंदानिळें कांपवितु । आमोदजळें वोलवितु । फुलांचे डोळें ॥ १५१८ ॥
कोकिळा कलरवाचेनि मिषें । सद्गद बोलवीत जैसें । वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामीं ॥ १५१९ ॥
कां जन्माचें फळ चकोरां । होत जैं चंद्र ये अंबरा । नाना नवघन मयूरां । वो देत पावे ॥ १५२० ॥
तैसा सज्जनांच्या मेळापीं । गीतापद्यरत्नीं उमपीं । वर्षे जो माझ्या रूपीं । हेतु ठेऊनि ॥ १५२१ ॥
मग तयाचेनि पाडें । पढियंतें मज फुडें । नाहींचि गा मागेंपुढें । न्याहाळितां ॥ १५२२ ॥
अर्जुना हा ठायवरी । मी तयातें सूयें जिव्हारीं । जो गीतार्थाचें करी । परगुणें संतां ॥ १५२३ ॥
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः । ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ॥ ७०॥
पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढिनली जे हे कहाणी । मोक्षधर्म का जिणीं । आलासे जेथें ॥ १५२४ ॥
तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हां दोघांचा संवादु । न करितां पदभेदु । पाठेंचि जो पढे ॥ १५२५ ॥
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती । तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥ १५२६ ॥
घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा । ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे ॥ १५२७ ॥
गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें । गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें ॥ १५२८ ॥
श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः । सोऽपि मुक्तः शुभा.ण्ल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ॥ ७१॥
आणि सर्वमार्गीं निंदा । सांडूनि आस्था पैं शुद्धा । गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो ॥ १५२९ ॥
तयाच्या श्रवणपुटीं । गीतेचीं अक्षरें जंव पैठीं । होतीना तंव उठाउठीं । पळेचि पाप ॥ १५३० ॥
अटवियेमाजीं जैसा । वन्हि रिघतां सहसा । लंघिती का दिशा । वनौकें तियें ॥ १५३१ ॥
कां उदयाचळकुळीं । झळकतां अंशुमाळी । तिमिरें अंतराळीं । हारपती ॥ १५३२ ॥
तैसा कानाच्या महाद्वारीं । गीता गजर जेथ करी । तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप ॥ १५३३ ॥
ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट । याहीवरी अचाट । लाहे फळ ॥ १५३४ ॥
जें इये गीतेचीं अक्षरें । जेतुलीं कां कर्णद्वारें । रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध कीं ॥ १५३५ ॥
म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती । तेणें स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखीं ॥ १५३६ ॥
तो पैं मज यावयालागीं । पहिलें पेणें करी स्वर्गीं । मग आवडे तंव भोगी । पाठीं मजचि मिळे ॥ १५३७ ॥
ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया । फळे महानंदें मियां । बहु काय बोलों ॥ १५३८ ॥
याकारणें हें असो । परी जयालागीं शास्त्रातिसो । केला तें तंव तुज पुसों । काज तुझें ॥ १५३९ ॥
No comments:
Post a Comment