अध्याय २: ओव्या ३१५-३३०

१५ जुलै २०१७ निरुपण
अध्याय २: सांख्ययोग (गीता श्लोक ६१-६३/ ज्ञानेश्वरी ओव्या ३१५-३३० )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१॥
म्हणौनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥ ३१५ ॥
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥
येर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥
जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥
तैसी विषयाची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२॥
क्रोधाद्‍भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्‍बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३॥
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्य तेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥
मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्‍लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥
जैसें जात्यंधा पळणीं पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥ ३२६ ॥
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥
चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी । तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखैं ॥ ३२८ ॥
म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥
तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥ ३३० ॥
सारांश
मागच्या श्लोकात (60) आपण ऐकले की इंद्रियांना जिंकणे हे फार कठीण आहे. मोठ्या मोठ्या साधकांना शमदमादी साधने करून सुद्धा ही इंद्रिये व्याकुळ करून सोडतात. असा हा इंद्रियांचा भयंकर प्रताप आहे!
त्यात ब्रह्मदेवांनी इंद्रिये *बहिर्मुख* केली असल्याने ते सतत बाहेर सुखाच्या शोधात धावत असतात. म्हणून विवेकी पुरुष प्रयत्न करून सुद्धा त्यांचे मन इंद्रियांना जबरदस्ती विषयाकडे ओढून नेतात व विवेकाचा नाश करतात. म्हणून साधकाने ती *अंतर्मुख* करून विषयांना आवर घालावा व बुद्धी आणि चित्तआत्मस्वरूपात स्थिर करावे (उदा. कासव). 

चित्ताला विषयप्राप्तीची ओढ लागली आणि त्यात काही अडथळा आला की आपोआपच क्रोध निर्माण होण्याची शक्यता असते व त्यामुळे बुद्धीचा समपणा व विवेक नष्ट होतो, त्यातून राग व द्वेष निर्माण होण्याची शक्यता असते. बुद्धी अस्थिर होते व वासनाच बुद्धिमध्ये स्थिर होऊन बसते! मग ती वासनाच आपल्या बुद्धीला dominate करून स्वतः ला हवे तसे विचित्र निर्णय घ्यायला भाग पाडते!

त्रिगुणांच्या कमी अधिकपणानुसार ही ओढ कमी जास्त प्रमाणात असणारच त्यामुळे आपण ती एक शुल्लक गोष्ट प्रारब्धाचा एक भाग समजून दुर्लक्ष करावी व त्यामुळे मनस्ताप करून आपली शांती व समाधान बिघडवू नये.
म्हणून चित्त सदैव बहिर्मुख भक्ती, ध्यान, उपासना, जप,...यामध्ये रममाण ठेवावे. 

सुखाचे सर्व विषय अनित्य असल्याने त्यात *सुख देण्याचे सामर्थ्य, स्वातंत्र्य* त्यांना नाही. कारण एकच विषय सर्वांना सारखे सुख देत नाहीत. मागील अध्यायात आपण पाहिलेच की कसे सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये विषयाचा आहार घेताना कुणाला सुख व कुणाला दुःख निर्माण करतांत. (उदा. थंड गार पाणी कुणाला आवडतो व कुणाला नाही हे त्या थंड पाण्याला माहीत नसते!) It is subjective and not objective.

मनात विषयाची थोडी सुद्धा वासना राहिली तर जन्म-मृत्यू च्या चक्रातून मुक्तता नाही. म्हणून भगवंताच्या भक्ती ची आपल्याला सदैव ओढ/गोडी लागली तर विषयाची गोडी आपोआप कमी होत जाते. बुद्धी एकदा स्थिर झाली की आत्मनात्म, नित्यनित्य, सारासार , सत्यमिथ्या विवेक जागृत होऊन आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. त्यामुळे विषय व विषयाचा रस या दोन्हीही गोष्टी control मध्ये येतात.

निश्चयात्मक बुद्धीत जर सदैव भगवंताचे अनुसंधान ठेवले तर तो माणूस सदा सुखी, आनंदी व समाधानी राहतो. त्याच्या जीवनात स्थैर व शांती लाभते.म्हणून तुकाराम महाराज म्हणतात: इंद्रियांचा जय वासनेचा क्षय


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099