अध्याय ६: ओव्या २११-२९२

२ सप्टेंबर २०१८ निरुपण 
अध्याय ६: ध्यानयोग  (गीता श्लोक १४ / ज्ञानेश्वरी ओव्या २११-२९२)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


प्रशांतात्मा विगतभीर्ब्रह्मचारिवरते स्थितः । मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥ १४॥

ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥ २११ ॥
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥ २१२ ॥
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥ २१३ ॥
जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । धरी फुगूं ॥ २१४ ॥
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥ २१५ ॥
मग थावलिये वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥ २१६ ॥
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥ २१७ ॥
धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥ २१८ ॥
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ॥ २१९ ॥
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥ २२० ॥
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ति करी उजगरा । कुंडलिनीतें ॥ २२१ ॥
नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥ २२२ ॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥ २२३ ॥
विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥ २२४ ॥
तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥ २२५ ॥
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ॥ २२६ ॥
तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥ २२७ ॥
सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥ २२८ ॥
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥ २२९ ॥
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥ २३० ॥
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥ २३१ ॥
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वींचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥ २३२ ॥
अधोभाग तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥ २३३ ॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥ २३४ ॥
मग सप्तधातूंच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥ २३५ ॥
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा । तो गच्च धरूनि माघारा । आंतु घाली ॥ २३६ ॥
तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे । तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥ २३७ ॥
एर्‍हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथें ? ॥ २३८ ॥
आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥ २३९ ॥
ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य हौनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥ २४० ॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥ २४१ ॥
तो अग्नि आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥ २४२ ॥
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें । जाय म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥ २४३ ॥
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥ २४४ ॥
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥ २४५ ॥
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥ २४६ ॥
तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनी मिळे । शक्तिमुखीं ॥ २४७ ॥
तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥ २४८ ॥
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥ २४९ ॥
तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरे । पांघुरली असे ॥ २५० ॥
जैशी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूनि ये ॥ २५१ ॥
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातोडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥ २५२ ॥
मग काश्मीरीचे स्वयंभ । कां रत्‍नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ॥ २५३ ॥
नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । कीं अंतर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥ २५४ ॥
कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव । मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥ २५५ ॥
तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांबलें जैसें ॥ २५६ ॥
तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिन्नला मळा । कोंवळिकेचा ॥ २५७ ॥
हो कां जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥ २५८ ॥
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पीये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥ २५९ ॥
वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥ २६० ॥
वयसा तरी येतुलेवरी । एर्‍हवीं बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपमु ॥ २६१ ॥
कनकद्रुमाच्या पालवीं । रत्‍नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥ २६२ ॥
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥ २६३ ॥
माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणियां । रोमांचियां ॥ २६४ ॥
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें । पाखाळींव होती डोळे । काय सांगों ॥ २६५ ॥
निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥ २६६ ॥
तैशीं पातियांचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे । आधिलीचि परी होये । गगना कवळिती ॥ २६७ ॥
आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जे आप आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥ २६८ ॥
मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥ २६९ ॥
पवनाचा वारिकां वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥ २७० ॥
आइकें प्राणाचा हातु धरूनी । गगनाची पाउटी करूनी । मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥ २७१ ॥
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥ २७२ ॥
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी । जे प्रणवाची उघडी । जन्मभूमी ॥ २७३ ॥
हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली । अनुहताची बोली । चावळे ते ॥ २७४ ॥
शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥ २७५ ॥
घोषाच्या कुंडीं । नादचित्रांचीं रूपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥ २७६ ॥
हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥ २७७ ॥
विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणौनि घुमे ॥ २७८ ॥
तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । सहज फिटे ॥ २७९ ॥
आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्य आधातुरें । करूनि असिजे ॥ २८० ॥
तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥ २८१ ॥
बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत तेथ न देखे । तैसें केलें ॥ २८२ ॥
निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली । ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ? ॥ २८३ ॥
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥ २८४ ॥
नातरी वायूचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निवटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥ २८५ ॥
तैशी हृदयकमळवेर्‍हीं । दिसे जैशी सोनियाची सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥ २८६ ॥
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तीचिमाजीं ॥ २८७ ॥
तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एर्‍हवीं तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नादुबिंदु नेणिजे । कळा ज्योती ॥ २८८ ॥
मनाचा हन मारु । कां पवनाचा आधारु । ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥ २८९ ॥
हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखां ॥ २९० ॥
पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । श्रीमहाविष्णु ॥ २९१ ॥
तया ध्वनिताचें केणें सोडुनि । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ॥ २९२ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099