१७ जानेवारी २०२१ निरुपण
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ २॥
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा । डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू ॥ १४४ ॥
आणि अधीं फांकली डाळें । तिये होती मूळें । तयाही तळीं पघळे । वेल पालवु ॥ १४५ ॥
ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं । तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों ॥ १४६ ॥
तरी बद्धमूळ अज्ञानें । महदादिकीं सासिनें । वेदांचीं थोरवनें । घेऊनियां ॥ १४७ ॥
परी आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज अंडज । हे बुडौनि महाभुज । उठती चारी ॥ १४८ ॥
यया एकैकाचेनि आंगवटें । चौयांशीं लक्षधा फुटे । ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंधचि होती ॥ १४९ ॥
प्रसवती शाखा सरळिया । नानासृष्टि डाहाळिया । आड फुटती माळिया । जातिचिया ॥ १५० ॥
स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके । आंदोळती आंगिकें । विकारभारें ॥ १५१ ॥
जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं । तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय ॥ १५२ ॥
मग शाखांचेनि आंगभारें । लवोनि गुंफिती परस्परें । गुणक्षोभाचे वारे । उदयजती ॥ १५३ ॥
तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें । तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ ॥ १५४ ॥
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका । मनुष्यजाती शाखा । थोरावती ॥ १५५ ॥
तिया ऊर्ध्वीं ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदी । आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या ॥ १५६ ॥
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव । पालव डोलती बरव । नीच नवे ॥ १५७ ॥
अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे । तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगाचीं ॥ १५८ ॥
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें । नानाकर्मांचे खांबे । नेणों किती ॥ १५९ ॥
तेवींचि भोगक्षीणें मागिलें । पडती देहांतींचीं बुडसळें । तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची ॥ १६० ॥
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे । विषयपल्लव नवे । नीत्य होती ॥ १६१ ॥
ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे । वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु ॥ १६२ ॥
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा । मग वाजों लागे घोरा । तमाचा तो ॥ १६३ ॥
तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा । पल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया ॥ १६४ ॥
अप्रवृत्तींचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे । घेत पान पालव डाळे । प्रमादाचीं ॥ १६५ ॥
बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें । तो पाला तया घुमें । टकेयावरी ॥ १६६ ॥
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार । तिहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली ॥ १६७ ॥
तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें । आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव ॥ १६८ ॥
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा । जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां ॥ १६९ ॥
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥ १७० ॥
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींहि नित्य नवा । निरयभोग यावा । फळाचा तो ॥ १७१ ॥
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी । जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥ १७२ ॥
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण । इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंची ॥ १७३ ॥
अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी । वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची ॥ १७४ ॥
म्हणौनि जीं मनुष्यडाळें । तियें जाणावीं अधींचि मूळें । जे एथूनि हा पघळे । संसारतरु ॥ १७५ ॥
एर्हवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां । अधींचिया मध्यस्था । शाखा इया ॥ १७६ ॥
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी । विरुढती या शाखीं । अधोर्ध्वींचिया ॥ १७७ ॥
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना । जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाहीं ॥ १७८ ॥
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा । तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळें ॥ १७९ ॥
आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं । मूळ गाढें तंव वाढी । पैस आथी ॥ १८० ॥
तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा । आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोंचि नये ॥ १८१ ॥
म्हणौनि देहें मानुषें । इयें मुळें होती न चुके । ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें ॥ १८२ ॥
मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥ १८३ ॥
तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं ॥ १८४ ॥
उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंची तिखें । डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी ॥ १८५ ॥
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवें । बुद्धि प्रकाश घे धांवे । विवेकावरी ॥ १८६ ॥
तेथ मेधारसें सगर्भ । अस्थापत्रीं सबोंब । सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे ॥ १८७ ॥
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा । घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या ॥ १८८ ॥
शिष्टागमविधानें । विविधयागवितानें । इये पानावरी पानें । पालेजती ॥१८९ ॥
ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया । देती वैराग्यशाखा कोंवळिया । वेल्हाळपणें ॥ १९० ॥
विशिष्टां व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख । जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती ॥ १९१ ॥
माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट । जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो ॥ १९२ ॥
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी । तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं ॥ १९३ ॥
पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी । पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे ॥ १९४ ॥
पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर । हे आडशाखा प्रकार । पैसु घेती ॥ १९५ ॥
याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें । द्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे ॥ १९६ ॥
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया । मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा ॥ १९७ ॥
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु । बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें ॥ १९८ ॥
वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी । ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती ॥ १९९ ॥
फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें । जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय ॥ २०० ॥
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा । ते वोवांडली देखा । बुडासि ये ॥ २०१ ॥
तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा । तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें ॥ २०२ ॥
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें । तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं ॥ २०३ ॥
परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें ।ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा ॥ २०४ ॥
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता । तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं ॥ २०५ ॥
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी । शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं ॥ २०६ ॥
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि । म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें ॥ २०७ ॥
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु । सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु ॥ २०८ ॥
आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें । आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा ॥ २०९ ॥
No comments:
Post a Comment