अध्याय १६ : ओव्या ४३३-४५४

 २३ मे  २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ( श्लोक  २२-२४ / ज्ञानेश्वरी ओव्या ४३३-४७३ )


एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् २२॥

धर्मादिकां चौंही आंतु । पुरुषार्थाची तैंचि मातु । करावी जैं संघातु । सांडील हा ॥ ४३३ ॥
हे तिन्ही जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती । हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे ॥ ४३४ ॥
जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे ।तेणें न धरावी हे सोये । सावधु होईजे ॥ ४३५ ॥
पोटीं बांधोनि पाषाण । समुद्रीं बाहीं आंगवण । कां जियावया जेवण । काळकूटाचें ॥ ४३६ ॥
इहीं कामक्रोधलोभेंसी । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणौनि ठावोचि पुसीं । ययांचा गा ॥ ४३७ ॥
जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे । तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे ॥ ४३८ ॥
त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर । त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय ॥ ४३९ ॥
तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं । संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा ॥ ४४० ॥
मग सत्संगें प्रबळें । सच्छास्त्राचेनि बळें । जन्ममृत्यूचीं निमाळें । निस्तरें रानें ॥ ४४१ ॥
ते वेळीं आत्मानंदें आघवें । जें सदा वसतें बरवें । तें तैसेंचि पाटण पावे । गुरुकृपेचें ॥ ४४२ ॥
तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा । तयें खेवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे ॥ ४४३ ॥
ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा । तो येवढिया लाभा । गोसावी होय ॥ ४४४ ॥

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत । न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३॥

ना हें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं । दाटिली जेणें डोई । आत्मचोरें ॥ ४४५ ॥
जो जगीं समान सकृपु । हिताहित दाविता दीपु ।तो अमान्यु केला बापु । वेदु जेणें ॥ ४४६ ॥
न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड । वाढवीत गेला कोड । इंद्रियांचें ॥ ४४७ ॥
कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष । स्वैराचाराचें असोस । वळघला रान ॥ ४४८ ॥
तो सुटकेचिया वाहिणीं । मग पिवों न लाहे पाणी । स्वप्नींही ते कहाणी । दूरीचि तया ॥ ४४९ ॥
आणि परत्र तंव जाये । हें कीर तया आहे । परी ऐहिकही न लाहे । भोग भोगूं ॥ ४५० ॥
तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला । कीं तेथही पावला । नास्तिकवादु ॥ ४५१ ॥
तैसें विषयांचेनि कोडें । जेणें परत्रा केलें उबडें । तंव तोचि आणिकीकडे । मरणें नेला ॥ ४५२ ॥
एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु । तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ? ॥ ४५३ ॥
म्हणौनि कामाचेनि बळें । जो विषय सेवूं पाहे सळें । तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो ॥ ४५४ ॥

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २४॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगोनाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥

याकारणें पैं बापा । जया आथी आपुली कृपा । तेणें वेदांचिया निरोपा । आन न कीजे ॥ ४५५ ॥
पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते ॥ ४५६ ॥
नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना ।शिष्य आत्मभुवना- । माजीं पैसे ॥ ४५७ ॥
हें असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा । तरी आदरें जेवीं दिवा । पुढां कीजे ॥ ४५८ ॥
तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था । तेणें श्रुतिस्मृति माथां । बैसणें घापे ॥ ४५९ ॥
शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें । जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ॥ ४६० ॥
ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा । तरी कें आहे अनिष्टा । भेटणें गा ? ॥ ४६१ ॥
पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती । नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥ ४६२ ॥
म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी । तंव हे कोणें न सांडावी । अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेंसीं ॥ ४६३ ॥
जे आजि अर्जुना तूं येथें । करावया सत्य शास्त्रें सार्थें । जन्मलासि बळार्थें । धर्माचेनि ॥ ४६४ ॥
आणि धर्मानुज हें ऐसें । बोधेंचि आलें अपैसें । म्हणौनि आनारिसें । करूं नये ॥ ४६५ ॥
कार्याकार्यविवेकीं । शास्त्रेंचि करावीं पारखीं । अकृत्य तें कुडें लोकीं । वाळावें गा ॥ ४६६ ॥
मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां आपुलेनि आंगें । आचरोनि आदरें चांगें । सारावें गा ॥ ४६७ ॥
जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी । लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी ॥ ४६८ ॥
एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा । तोहि देवें पांडवा । निरूपिला ॥ ४६९ ॥
इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा । पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका ॥ ४७० ॥
संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा । तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां ॥ ४७१ ॥
तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा । तरी तुम्हां माने येवढा । होईन मी ॥ ४७२ ॥
म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान । दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४७३ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099