१८ ऑक्टोबर २०२० निरुपण
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥ १ ॥
जय जय सर्व विसांवया । सोहंभावसुहावया । नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ॥ २ ॥
आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू । विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥ ३ ॥
तू जयांप्रति लपसी । तया विश्व हें दाविसी । प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥ ४ ॥
कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरें ॥ ५ ॥
जी तूंचि तूं सर्वां यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमो तुज ॥ ६ ॥
जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें । तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वियेसी ॥ ७ ॥
रविचंद्रादि शुक्ती । उदो करिती त्रिजगतीं । तें तुझिया दीप्ती । तेज तेजां ॥ ८ ॥
चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें । नभ तुजमाजीं खेळे । लपीथपी ॥ ९ ॥
किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस । असो वानणें सायास । श्रुतीसि हे ॥ १० ॥
वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझें आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती ॥ ११ ॥
जी एकार्णवाचे ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं । मा महानदी काई । जाणिजती ॥ १२ ॥
कां उअदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु । आम्हां श्रुति तुज आंतु । तो पाडु असे ॥ १३ ॥
आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे । तो तूं मा कोणें तोंडें । वानावासी ॥ १४ ॥
यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता । चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥ १५ ॥
तरी तू जैसा आहासि तैसिया । नमो जी श्रीगुरुराया । मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं ॥ १६ ॥
आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी । करीं ज्ञानपद्य जोडी । थोरा मातें ॥ १७ ॥
मग मी संसरेन तेणें । करीन संतांसी कर्णभूषणें । लेववीन सुलक्षणें । विवेकाचीं ॥ १८ ॥
जी गीतार्थनिधान । काढू माझें मन । सुयीं स्नेहांजन । आपलें तूं ॥ १९ ॥
हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । तैसा उदैजो जो निर्मळें । कारुण्यबिंबें ॥ २० ॥
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सफळ । तो वसंतु होय स्नेहाळ- । शिरोमणी ॥ २१ ॥
प्रमेय महापूरें । हे मतिगंगा ये थोरें । तैसा वरिष उदारें । दिठीवेनी ॥ २२ ॥
अगा विश्वैकधामा । तुझा प्रसाद चंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ॥ २३ ॥
जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें । वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें ॥ २४ ॥
तंव संतोषोनि श्रीगुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें । मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें ॥ २५ ॥
हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥ २६ ॥
हो कां जी स्वामी । हेंचि पाहत होतों मी । जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग ॥ २७ ॥
सहजें दुर्वेचा डिरु । आंगेंचि तंव अमरु । वरी आला पूरु । पीयूषाचा ॥ २८ ॥
तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें । मूळशास्त्रपदें । वाखाणीन ॥ २९ ॥
परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे । ना श्रवणीं तरी चाडे । वाढी दिसे ॥ ३० ॥
तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी । माले मागूनि घरीं । गुरुकृपेच्या ॥ ३१ ॥
तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोठी ऐसी । श्रीकृष्ण अर्जुनेंसी । चावळले ॥ ३२ ॥
जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होईजे येणें जगें । आत्मा गुणसंगें । संसारिया ॥ ३३ ॥
आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःख भोगीं हेतु । अथवा गुणातीतु । केवळु हा ॥ ३४ ॥
तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञायोगु । सुखदुःखादि भोगु । केवीं तया ? ॥ ३५ ॥
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती । तरी गुणातीतीं । चिन्हें काई ? ॥ ३६ ॥
एवं इया आघवेया । अर्था रूप करावया । विषो एथ चौदाविया । अध्यायासी ॥ ३७ ॥
तरी तो आतां ऐसा । प्रस्तुत परियेसा । अभिप्रायो विश्वेशा । वैकुंठाचा ॥ ३८ ॥
तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना । मेळऊनि इया ज्ञाना । झोंबावें हो ! ॥ ३९ ॥
आम्हीं मागां तुज बहुतीं । दाविलें हें उपपत्ती । तरी आझुनी प्रतीती- । कुशीं न निघे ॥ ४० ॥
![]() |



No comments:
Post a Comment