।। जय श्री राम ।।
अध्याय १२ श्लोक ९
।।अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ॥९॥
१२ व्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्री कृष्ण ह्यांना सर्वात श्रेष्ठ भक्त कोणते, सगुण भक्ती करणारे की निर्गुण भक्ती करणारे? असा प्रश्न विचारला आहे.
भगवंत ह्या प्रश्नाला खूप सुंदर उत्तर देतात आणि संपूर्ण १२वा अध्याय हा भक्त कसा असावा, भक्ती कशी करावी, भक्तीचे मार्ग कोणते आणि भक्तीची उपकरणे (tools ) कोणती ह्या विषयी आहे.
भगवंत म्हणतात की जे कोणी परमेश्वर प्राप्ती हे एकच ध्येय ठेवून, माझ्यावर पूर्ण निष्ठा ठेवून माझी उपासना करतात ते मलाच येऊन भेटतात, मग ते मन एकाग्र करून निरंतर माझ्या ध्यानामध्ये राहून माझी सगुण रूपाने भक्ती करणारे असोत किंवा आपल्या सगळ्या इंद्रियांना वश करून, मन आणि बुद्धी च्या पलीकडे जे निराकार, अविनाशी, अचिंत्य, अव्यक्त असे जे रूप आहे, जे ओंकारच्या ही पलीकडे आहे (ओंकार जे निर्मितीचे पहिले व्यक्त स्वरूप आहे) अश्या माझ्या निर्गुण स्वरूपाची उपासना करणारे भक्त असोत ते सगळे मलाच येऊन भेटतात.
माऊलींनी सुद्धा ही भक्ती समजवायला खूप छान दृष्टांत दिले आहेत. भगवंत म्हणतात की सूर्याची किरणे जसे सूर्यास्ताच्या वेळी त्याच्या मागोमाग जातात तसेच माझे भक्त मला येऊन मिळतात. पावसाळ्यात जशी पाण्याने तुडुंब भरलेली नदी उसळ्या घेत सागराला येऊन मिळते आणि एकदाच नव्हे तर निरंतर सागरामध्ये मिसळत जाते तसे माझे भक्त शेवटी मलाच येऊन भेटतात .
९व्या श्लोका मध्ये आपल्याला भगवंताचे आपल्या भक्तांवर असलेले प्रेम दिसते. भगवंताने आपल्या भक्तांना कुठलीही कठोर साधना सांगितली नाहीये किंवा त्याची अपेक्षा सुद्धा ठेवलेली नाहीये. ते म्हणतात की, अरे, जर तुला मन स्थिर करून, एकाग्र करून माझी भक्ती करता येत नसेल तर तू अभ्यासरूप योगा द्वारे माझी भक्ती कर. ते म्हणतात की माझ्या नावाचे आणि गुणाचे श्रवण कर, किर्तन कर, मनन कर, श्वासांवर जप कर. मी सांगितलेल्या शास्त्राचे पठण करणे हा सुद्धा एक अभ्यास आहे. आणि ह्यांच्याद्वारे सुद्धा तू मला प्राप्त करण्याची इच्छा धरू शकतोस.
मला वाटते अभ्यासरूप योग ही भगवंताला समजून, साधना सुरु करायची पहिली पायरी आहे, आणि एक निश्चित पायरी आहे आणि भगवंतांनीच ती सुचवलेली आहे.
ह्याचे एक उदाहरण म्हणजे विष्णुसहस्त्रनाम पठण. जेव्हा मन अशांत असेल, मार्ग सापडत नसतील तर देवाजवळ दिवा लावून, विष्णुसहस्त्रनाम पठण केल्याने मन खरंच शांत होते. आणि अशा शांत मनात आशा पल्लवित होतात, मार्ग आपोआप समोर येतात.
जो साधक मंत्रदेवता श्री भगवंतांना शरण जाऊन या विष्णुसहस्त्रनाम मंत्राचे आवर्तन करतो, नित्यनेमाने वाचन करतो, अनुष्ठान करतो त्याचे श्रीभगवंत पुत्रवत पालन करतात. या विषयी अनेक साधु संतांचे अनुभव प्रमाण म्हणून सांगता येतील. श्रीसंत दासगणू महाराजांच्या चरित्रातही 'श्रीविष्णूसहस्रनाम स्तोत्रा' च्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आलेली आहे.
या सहस्रनामांचा अर्थ मूलतः एक श्री भगवंत असाच होतो. त्यामुळे श्रीभगवंताचे जे रूप आपल्याला प्रिय वाटते, जे रूप आपल्याला आवडते त्या रूपाचे ध्यान करणे, स्मरण करणे म्हणजे विष्णुसहस्त्रनामाचे स्मरण करणे होय.
श्री भगवंतांना त्यांचे भक्त अत्यंत प्रिय असतात, म्हणून त्यांना ते काही कमी पडू देत नाहीत. त्यांचे नुसते स्मरण केले तरी ते भक्ताला त्याचे इच्छित द्यायला समर्थ असतात .
असा हा अभ्यासयोग मला खूप भावला आणि नित्य त्याची प्रचिती सुद्धा येते.
No comments:
Post a Comment