२४ जानेवारी २०२१ निरुपण
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ ३॥
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी ।जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ? ॥ २१० ॥
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी । आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे ॥ २११ ॥
हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं ।माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं ॥ २१२ ॥
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु । तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो ॥ २१३ ॥
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ? ॥ २१४ ॥
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ? ॥ २१५ ॥
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ? ॥ २१६ ॥
आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥ २१७ ॥
कय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं । तैशी जाण ते काहाणी । दुगळींचि ते ॥ २१८ ॥
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥ २१९ ॥
तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥ २२० ॥
म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥ २२१ ॥
मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं । वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ? ॥ २२२ ॥
मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें । म्हणौनि संसाररुख सतुकें । वावोचि गा ॥ २२३ ॥
आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं । तेंही साचचि पाहीं । येकें परी ॥ २२४ ॥
तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे ? । रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ? ॥ २२५ ॥
तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥ २२६ ॥
वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ । तंव तरंगतां अनंत । म्हणावीचि कीं ॥ २२७ ॥
म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे । कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि ॥ २२८ ॥
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये । तैंचि यया अंतु आहे । एर्हवीं नाहीं ॥ २२९ ॥
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी । तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या ॥ २३० ॥
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं । मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ? ॥ २३१ ॥
जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे । आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ? ॥ २३२ ॥
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये । यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा ॥ २३३ ॥
वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका । नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां ॥ २३४ ॥
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा । म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ? ॥ २३५ ॥
जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण । तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा ॥ २३६ ॥
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं । माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते ॥ २३७ ॥
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे । माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें ॥ २३८ ॥
तेसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं । परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥ २३९ ॥
नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे । तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा ॥ २४० ॥
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे । लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा ॥ २४१ ॥
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां । तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय ॥ २४२ ॥
स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें । तेवीं आभासु हा क्षणिकें । रिताचि गा ॥ २४३ ॥
देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे । जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं ॥ २४४ ॥
तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे । आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा ॥ २४५ ॥
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा । तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया ॥ २४६ ॥
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी । आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा ॥ २४७ ॥
आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी । तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा ॥ २४८ ॥
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके । तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये ॥ २४९ ॥
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं । म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें ॥ २५० ॥
एर्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥ २५१ ॥
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥ २५२ ॥
तेवीं नाथिलिया संसारा । उपाईं जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥ २५३ ॥
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥ २५४ ॥
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥ २५५ ॥
उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥ २५६ ॥
हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥ २५७ ॥
मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळें । हातवसावें ॥ २५८ ॥
निसळें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेचि ॥ २५९ ॥
परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवरी ॥ २६० ॥
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया । पुढें दुजें नुरेल घाया- । पुरतें गा ॥ २६१ ॥
तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥ २६२ ॥
शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥ २६३ ॥
नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥ २६४ ॥
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ । तें कांहींचि न दिसे मृगजळ । चादिणां जेवीं ॥ २६५ ॥
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ॥ २६६ ॥
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ ४॥
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें ।तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥ २६७ ॥
परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें । मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो ॥ २६८ ॥
हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके ॥ २६९ ॥
नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब । निहटे कां नभीं नभ । घटाभावीं ॥ २७० ॥
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां । तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ॥ २७१ ॥
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें ।आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ॥ २७२ ॥
कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥ २७३ ॥
आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें । तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥ २७४ ॥
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें ॥ २७५ ॥
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥ २७६ ॥
पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले । पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ ॥ २७७ ॥
संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा । ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां ॥ २७८ ॥
अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया । पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी ॥ २७९ ॥
पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी । वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची ॥ २८० ॥
जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें । हीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं ॥ २८१ ॥
पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें आपुलें । पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें ॥ २८२ ॥
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया । तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं ॥ २८३ ॥
परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे । महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण ॥ २८४ ॥
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ ५॥
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान । वर्षांतीं जैसें घन । आकाशातें ॥ २८५ ॥
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा । तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे ॥ २८६ ॥
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभें प्रबळे । तयाची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे ॥ २८७ ॥
आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी । तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे ॥ २८८ ॥
आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी । तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें ॥ २८९ ॥
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहाहंता तैसी । अविद्येसवें ॥ २९० ॥
पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें । तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे ॥ २९१ ॥
लोहाचें साम्कडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा । द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया ॥ २९२ ॥
अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें । तियें जयां कां समोरें । होतीचिना ॥ २९३ ॥
स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण ।उपवढलिया जाण । जियापरी ॥ २९४ ॥
तैसेम् सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं । न घेपिजती सर्पीं । गरुड जैसें ॥ २९५ ॥
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंसु ॥ २९६ ॥
जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी । मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि ॥ २९७ ॥
तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं । ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे ॥ २९८ ॥
किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा । बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजीं जैसा ॥ २९९ ॥
पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें । जैसें येथूनि पर्हां जाणें । आकाशा नाहीं ॥ ३०० ॥
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥ ३०१ ॥
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु । तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा ॥ ३०२ ॥
चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला । तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां ॥ ३०३ ॥
हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें । तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां ॥ ३०४ ॥
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशें । ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम ॥ ३०५ ॥
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं । तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया ॥ ३०६ ॥
दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे । अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे ॥ ३०७ ॥
No comments:
Post a Comment