२ जानेवारी २०२२ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुचः ॥ ६६॥
आशा जैसी दुःखातें । व्यालीं निंदा दुरितें । हे असो जैसें दैन्यातें । दुर्भगत्व ॥ १३९० ॥
तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक । तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें ॥ १३९१ ॥
हातीं घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु । कां निद्रात्यागें घराचारु । स्वप्नींचा जैसा ॥ १३९२ ॥
नाना सांडिलेनि कवळें । चंद्रींचें धुये पिंवळें । व्याधित्यागें कडुवाळें\- । पण मुखाचें ॥ १३९३ ॥
अगा दिवसा पाठीं देउनी । मृगजळ घापे त्यजुनी । कां काष्ठत्यागें वन्ही । त्यजिजे जैसा ॥ १३९४ ॥
तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ । तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात ॥ १३९५ ॥
मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया । सनिद्र स्वप्न गेलया । आपणपें जैसें ॥ १३९६ ॥
तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं । सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय ॥ १३९७ ॥
पैंं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण । तयाचि नांव शरण । मज यीणें गा ॥ १३९८ ॥
जैसें घटाचेनि नाशें । गगनीं गगन प्रवेशे । मज शरण येणें तैसें । ऐक्य करी ॥ १३९९ ॥
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ १४०० ॥
वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी । जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां ॥ १४०१ ॥
मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेंचि असिजे । धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं ॥ १४०२ ॥
अगा प्राकृताही राया । आंगीं पडे जें धनंजया । तें दासिरूंहि कीं तया । समान होय ॥ १४०३ ॥
मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे । हे बोल नको वोखटें । कानीं लाऊं ॥ १४०४ ॥
म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें । तें करीं हातां येतें । ज्ञानें येणें ॥ १४०५ ॥
मग ताकौनियां काढिलें । लोणी मागौतें ताकीं घातलें । परी न घेपेचि कांहींं केलें । तेणें जेवीं ॥ १४०६ ॥
तैसें अद्वयत्वें मज । शरण रिघालिया तुज । धर्माधर्म हे सहज । लागतील ना ॥ १४०७ ॥
लोह उभें खाय माती । तें परीसाचिये संगतीं । सोनें जालया पुढती । न शिविजे मळें ॥ १४०८ ॥
हें असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही । मग काष्ठेंही कोंडोनी । न ठके जैसा ॥ १४०९ ॥
अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु । कीं प्रबोधीं होय गोचरु । स्वप्नभ्रमु । ॥ १४१० ॥
तैसें मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वांचूनियां । आन कांहीं उरावया । कारण असे ? ॥ १४११ ॥
म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं । तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन ॥ १४१२ ॥
तेथ सर्वबंधलक्षणें । पापें उरावें दुजेपणें । तें माझ्या बोधीं वायाणें । होऊनि जाईल ॥ १४१३ ॥
जळीं पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा । तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा ॥ १४१४ ॥
येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया । घेईं मज प्रकाशोनियां । सोडवीन तूंतें ॥ १४१५ ॥
याकारणें पुढती । हे आधी न वाहे चित्तीं । मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण ॥ १४१६ ॥
ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें । सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें ॥ १४१७ ॥
मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो ॥ १४१८ ॥
न पवतां जयातें । काखे सूनि बुद्धीतें । बोंलणें मागौतें । वोसरलें ॥ १४१९ ॥
ऐसें जें कांहीं येक । बोला बुद्धीसिही अटक । तें द्यावया मिष । खेवाचें केलें ॥ १४२० ॥
हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें । द्वैत न मोडितां केलें । आपणा{ऐ}सें अर्जुना ॥ १४२१ ॥
दीपें दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला । द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
तेव्हां सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया । तेथ वाडु तऱ्हीं बुडोनियां ॥ ठेला देवो ॥ १४२३॥
सिंधु सिंधूतें पावों जाये । तें पावणें ठाके दुणा होये । वरी रिगे पुरवणिये । आकाशही ॥ १४२४ ॥
तैसें तयां दोघांचें मिळणें । दोघां नावरे जाणावें कवणें । किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें ॥ १४२५ ॥
एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें ॥ १४२६ ॥
येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा । हें म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगों ॥ १४२७ ॥
तरी जयाच्या निःश्वासीं । जन्म झाले वेदराशी । तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं । बोलला स्वमुखें ॥ १४२८ ॥
म्हणौनि वेदां मूळभूत । गीता म्हणों हें होय उचित । आणिकही येकी येथ । उपपत्ति असे ॥ १४२९ ॥
जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे । तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं ॥ १४३० ॥
तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु । गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा ॥ १४३१ ॥
म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज । गमे आणि सहज । दिसतही आहे ॥ १४३२ ॥
जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग । भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें ॥ १४३३ ॥
तियेचि कर्मादिकें तिन्ही । कांडें कोणकोणे स्थानीं । गीते आहाति तें नयनीं । दाखऊं आईक ॥ १४३४ ॥
तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो । द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला ॥ १४३५ ॥
मोक्षदानीं स्वतंत्र । ज्ञानप्रधान हें शास्त्र । येतुलालें दुजीं सूत्र । उभारिलें ॥ १४३६ ॥
मग अज्ञानें बांधलेयां । मोक्षपदीं बैसावया । साधनारंभु तो तृतीया\- । ध्यायीं बोलिला ॥ १४३७ ॥
जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें । विहित परी अप्रमादें । अनुष्ठावें ॥ १४३८ ॥
ऐसेनि सद्भावें कर्म करावें । हा तिजा अध्यावो जो देवें । निर्णय केला तें जाणावें । कर्मकांड येथ ॥ १४३९ ॥
आणि तेंचि नित्यादिक । अज्ञानाचें आवश्यक । आचरतां मोंचक । केवीं होय पां ॥ १४४० ॥
ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया । देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया । सांगितली ॥ १४४१ ॥
जे देहवाचामानसें । विहित निपजे जें जैसें । तें एक ईश्वरोद्देशें । कीजे म्हणितलें ॥ १४४२ ॥
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें । भजनकथनाचें खागें । आदरिलें शेषभागें । चतुर्थाचेनी ॥ १४४३ ॥
तें विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जंव आघवा । तंव कर्में ईशु भजावा । हें जें बोलिलें ॥ १४४४ ॥
तें अष्टाध्यायीं उघड । जाण येथें देवताकांड । शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोलें ॥ १४४५ ॥
आणि तेणेंचि ईशप्रसादें । श्रीगुरुसंप्रदायलब्धें । साच ज्ञान उद्बोधे । कोंवळें जें ॥ १४४६ ॥
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं । अथवा अमानित्वादिकीं । वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणूं ॥ १४४७ ॥
तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी । ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासीं ॥ १४४८ ॥
म्हणौनि चहूंही इहीं । ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं । ज्ञानकांड ये ठायीं । निरूपिजे ॥ १४४९ ॥
एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी । गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे ॥ १४५० ॥
हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥ १४५१ ॥
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं । वैर करी जो प्रतिदिवशीं । तो अज्ञानवर्ग षोडशीं । प्रतिपादिजे ॥ १४५२ ॥
तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा । हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ ॥ १४५३ ॥
ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी । आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवें ॥ १४५४ ॥
तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका । तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो ॥ १४५५ ॥
एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु । हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण ॥ १४५६ ॥
वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं । जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ॥ १४५७ ॥
येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां । अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ॥ १४५८ ॥
तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें । वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया ॥ १४५९ ॥
ना हे अर्थु रिगोनि मनीं । श्रवणें लागोनि कानीं । जपमिषें वदनीं । वसोनियां ॥ १४६० ॥
ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणें । गीता लिहोनि वाहाणें । पुस्तकमिषें ॥ १४६१ ॥
ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा । गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची ॥ १४६२ ॥
परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया । रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ ॥ १४६३ ॥
तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे । कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा ॥ १४६४ ॥
यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं । रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला ॥ १४६५ ॥
म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता । श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली ॥ १४६६ ॥
परी वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें । जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण ॥ १४६७ ॥
चातकाचियें कणवें । मेघु पाणियेसिं धांवे । तेथ चराचर आघवें । निवालें जेवीं ॥ १४६८ ॥
कां अनन्यगतिकमळा\- । लागीं सूर्य ये वेळोवेळां । कीं सुखिया होईजे डोळां । त्रिभुवनींचा ॥ १४६९ ॥
तैसें अर्जुनाचेनि व्याजें । गीता प्रकाशूनि श्रीराजें । संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें ॥ १४७० ॥
No comments:
Post a Comment