१८ एप्रिल २०२१ निरुपण
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता । भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३॥
आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानमार्गीं । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥ १८६ ॥
वोखटें मरणा{ऐ}सें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ॥ १८७ ॥
तैसें आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धांवों आवडे पाणधी । शून्याचिये ॥ १८८ ॥
न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचें ॥ १८९ ॥
ऐसें ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक तें ॥ १९० ॥
आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसें देह वाहोनि रोमा । वाहणें नेणें ॥ १९१ ॥
आणि मातलिया इंद्रियांचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग । अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥ १९२ ॥
यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु । तरी अगस्त्य कां होऊनि धीरु । उभा ठाके ॥ १९३ ॥
आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका । ते गिळी येकी झुळुका । वारा जेवीं ॥ १९४ ॥
तैसें अधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां । पातलेयां पांडवा । गिळुनि घाली ॥ १९५ ॥
ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी । धृति म्हणिपे अवधारीं । तियेतें गा ॥ १९६ ॥
आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगें पीयूखें । तया कलशाचियासारिखें । शौच असें ॥ १९७ ॥
जे आंगीं निष्काम आचारु । जीवीं विवेकु साचारु । तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि ॥ १९८ ॥
कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें ॥ १९९ ॥
कां जगाचें आंध्य फेडितु । श्रियेचीं राउळें उघडितु । निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे ॥ २०० ॥
तैसीं बांधिलीं सोडिता । बुडालीं काढिता । सांकडी फेडिता । आर्तांचिया ॥ २०१ ॥
किंबहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति । आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे ॥ २०२ ॥
वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं । संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें ॥ २०३ ॥
पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी । तें सांगितलें हें दिठी । पाहों ये तैसें ॥ २०४ ॥
आणि गंगा शंभूचा माथां । पावोनि संकोचे जेवीं पार्था । तेवीं मान्यपणें सर्वथा । लाजणें जें ॥ २०५ ॥
तें हें पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती । मागां सांगितलेंसे किती । तेंचि तें बोलों ॥ २०६ ॥
एवं इहीं सव्विसें । ब्रह्मसंपदा हे वसत असे । मोक्षचक्रवर्तीचें जैसें । अग्रहार होय ॥ २०७ ॥
नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी । निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली ॥ २०८ ॥
कीं गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा । वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे ॥ २०९ ॥
कीं सव्विसें गुणज्योती । इहीं उजळूनि आरती । गीता आत्मया निजपती । नीरांजना आली ॥ २१० ॥
उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें । दैवी शुक्तिकळें । गीतार्णवींची ॥ २११ ॥
काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी । केलें दैवी गुणराशी । संपत्तिरूप ॥ २१२ ॥
आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते ॥ २१३ ॥
पैं त्याज्य त्यजावयालागीं । जाणावी जरी अनुपयोगी । तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती ॥ २१४ ॥
तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषींघोरीं । मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे ॥ २१५ ॥
नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु । आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा ॥ २१६ ॥
No comments:
Post a Comment