अध्याय ८ : ओव्या ११७-१५५

२४  फेब्रुवारी २०१९ निरुपण 
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक १३-१६ / ज्ञानेश्वरी ओव्या  ११७-१५५)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् । यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३॥
तैसें  हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे । मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें ॥ ११७ ॥
म्हणौनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ॥ ११८ ॥
यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें ।जया पावणया परौतें । आणिक पावणें नाहीं ॥ ११९ ॥
तेथ अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये ।ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंतीं ॥ १२० ॥
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीविताचें सुख बुडालिया ।आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें ॥ १२१ ॥
ते वेळीं बैसावेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें ।तेथ काह्याचेनि अंतःकरणें । प्रणव स्मरावा ॥ १२२ ॥
तरि गा ऐशिया हो ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं ।पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होय ॥ १२३ ॥
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः ।तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् । नाप्‍नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥ १५॥
जे विषयांसि तिळांजळी देउनी । प्रवृत्तीवरी निगड वाऊनि । मातें हृदयीं सूनि । भोगिताती ॥ १२४ ॥
परि भोगितया आराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां ।तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु ॥ १२५ ॥
ऐसें निरंतर एकवटले । जे अंतःकरणीं मजशीं लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासिती ॥ १२६ ॥
तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें । मग म्यां जरी पावावें । तरी उपास्ति ते कायसी ? ॥ १२७ ॥
पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती धांव गा धांव म्हणे । तरी तयाचिये ग्लानि धांवणें । काय न घडे मज ? ॥ १२८ ॥
आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा । म्हणौनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा ॥ १२९ ॥
तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरिला कीं पावावा । तो आभारुही जीवां । साहवेचि ना ॥ १३० ॥
तें ऋणवैपण देखोनि आंगीं । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं । भक्तांचियां तनुत्यागीं । परिचर्या करीं ॥ १३१ ॥
देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमारा । म्हणौनि आत्मबोधाचिया पांजिरां । सूयें तयातें ॥ १३२ ॥
वरी आपुलिया स्मरणाची उवाइली । हींव ऐसी करीं साउली । ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयातें ॥ १३३ ॥
म्हणौनि देहांतींचें सांकडें । माझिया कहींचि न पडे । मी आपुलियातें आपुलीकडे । सुखेंचि आणीं ॥ १३४ ॥
वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी । शुद्ध वासना निवडुनी । आपणपां मेळवीं ॥ १३५ ॥
आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठावो नाहीं । म्हणौनि अव्हेरु करितां कांहीं । वियोगु ऐसा न वाटे ॥ १३६ ॥
नातरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपें यातें न्यावें । हेंही नाहीं स्वभावें । जे आधींचि मज मीनले ॥ १३७ ॥
येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेचि साउली । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ॥ १३८ ॥
ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत । म्हणौनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥ १३९ ॥
मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी ।जे मृत्युकाकासीं कुरोंडी । सांडिली आहे ॥ १४० ॥
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥ १४१ ॥
जें दुर्मतीचें मूळ । जें कुकर्माचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥ १४२ ॥
जें संसाराचें बैसणें । जें विकारांचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥ १४३ ॥
जें काळाचा खिचु उशिटा । जें आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें ॥ १४४ ॥
जें भुलीचें भरिव । जें विकल्पाचें वोतिंव । किंबहुना पेंव । विंचुवांचें ॥ १४५ ॥
जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र । जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित ॥ १४६ ॥
जें लावेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा । जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा ॥ १४७ ॥
जें कोढियाचें खेंव । जें काळसर्पाचें मार्दव । गोरियेचें स्वभाव । गायन जें ॥ १४८ ॥
जें वैरियाचा पाहुणेरु । जें दुर्जनाचा आदरु । हें असो जें सागरु । अनर्थांचा ॥ १४९ ॥
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन । जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे ॥ १५० ॥
ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥ १५१ ॥

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६॥

एर्‍हवीं ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियाचे जैसें । पोट न दुखे ॥ १५२ ॥
नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापुरें । तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥ १५३ ॥
एर्‍हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ॥ १५४ ॥
जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी । विळोनि पांतीं उठी एकसरी । चवदाजणांची ॥ १५५ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099