रमेशकाका संगमनेरकर स्वाध्याय

१ ऑगस्ट 

 एक तरी ओवी अनुभवावी

एकदा घरी वांग्याचे भरीत, पातीच्या कांद्याचा झुणका, ज्वारीची भाकरी, हिरव्या मिरची लसणाचा  ठेचा असा जेवणाचा बेत होता. वांगी भाजतांना तो खरपूस वास नाकांत शिरून भूक चेतवत होता. आम्ही सर्व जण जेवायला बसलो. आणि त्याचवेळी शेजारच्या घरांतून पुलावाचा सुगंध नाकांत शिरला. झालं. मन त्या न मिळणार्या पुलावातच गुंतले. 

आपले पण असेच होते न. मोबाईल वर एखादा सुंदर अभंग अगदी तल्लीन होऊन आपण ऐकत असतो आणि कुठून तरी जुन्या पाहिलेल्या पिक्चर च्या लोकप्रिय गाण्याची लकेर कानावर पडते आणि मन वर्तमानांतून भूतकाळांत रममाण होते. पण लगेच आपण हा सुंदर अभंग ऐकत होतो हे आठवते..आ़णि पुन्हा त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. पण आता अस होत की भरीत, झुणका,भाकरी,हिरव्या मिरची चा ठेचा या ऐवजी मन पुलावातच पुन्हा पुन्हा अडकते. 

परंतु जर मनाचा कल त्या अभंगाचा पुन्हा आस्वाद घेण्याचा असेल तर आपण काहीतरी वेगळा उपाय शोधून काढतो. कानात ईअर फोन घालून, अभंगाच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ ध्यानात घ्यायला लागल्यावर, त्याला लावलेल्या सुंदर चालीकडे, बॅकग्राउंड म्युझिक कडे आणि गायकाच्या गोड आवाजात आपले मन पुन्हा रमु लागते.. मग आपण तोच अभंग अनेक वेळा मन लावून ऐकतो आणि प्रत्येक वेळी आपल्याला त्यातील गुढ अर्थ उलगडू लागतो आणि गोडी वाढत जाते.. 

आणि मग आपण नवीन अभंग घेतो. अशारितीने आपला अभ्यास वाढत जातो. 


माउली म्हणतात, " अगा अभ्यासयोगु म्हणिजे। तो हा एक जाणिजे। येणें कांहीं न निपजे। ऐसें नाहीं।। "


योगासने करतांना मला याचा प्रत्यय वारंवार येतो. एकच साधं सोपं आसन करतांना सुरवातीला ती अंतिम स्थिती साधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत. 

माउलींच्या शब्दांत, ", वांचूनि योगाचेनि बळें। अधिक कांहीं मिळे। ऐसें नाहीं आगळें। कष्टचि तयां।। 

पण जसा जसा रोज रोज अभ्यास वाढत गेला तस तस लक्षात येऊ लागले की फक्त बाह्य स्थिती साधण्यासाठी एवढे कष्ट कां घ्यायचे. मग मी आसन करतांनाच शरीरांतील अंतर्गत होणाऱ्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करणे सुरू केले. तेंव्हा जाणवलं की काही काही स्नायुंना गरज नसतांनाही मी ताण देतो आहे आणि ज्यांना जास्त प्रमाणात ताण आवश्यक आहे त्यांना अत्यल्प प्रमाणांत दिला आहे. त्या प्रमाणे करेक्शन केल्या नंतर फारच सोपे झाले. तसेच आसने करतांना श्वासाच्या नियमनाचा अभ्यास सुरू केला आणि खूपच रिलॅक्स होऊ लागलो. 

एकदा मंजिरी कडून पंचकोषांविषयी ऐकले होते. मग विचार आला की योगासने करतांना मी जसे माझ्या अन्नमय कोषातील होणाऱ्या घडामोडींची, बदलांची नोंद घेतो तसेच प्राणमय कोष अनुभवू शकू कां? 

मग प्राणायाम करतांना त्या दृष्टीने अभ्यास सुरू झाला. खूप लक्ष केंद्रित केल्यानंतर हे पण थोड थोड जमू लागल आहे आता.. प्राणापानाच मिलन मणिपूर ला होत असल्याच जाणवू लागलं. 

" अगा अभ्यासयोगु म्हणिजे। तो हा एक जाणिजे। येणें कांहीं न निपजे। ऐसें नाहीं।। " याचा प्रत्यय आला.. 

।। सद्गुरू महाराज की जय ।।


५ ऑगस्ट 

एकतरी ओवी अनुभवावी

रोज नेहमी प्रमाणे सकाळी पार्क मधे गेलो. योगासने करतांना सहज walking track कडें लक्ष गेले. एक वयस्क बाई आपल्या मतिमंद मुलाचा हात धरुन चालली होती. मुलगा जवळपास २३-२४ वर्षाचा असावा. मनांत विचार सुरु झाला, " कसं सांभाळत असेल एवढ्या मोठ्या मुलाला ही माउली." 

ती जेंव्हा दुसऱ्या राउंड ला आली, तेंव्हा मी तिच्या जवळ जाऊन तिला विचारलेच, "कसं काय तुम्ही याला सांभाळता हो?" तिने जे उत्तर दिले ते मोठे मार्मिक आणि मनाला चालना देणारे होते. ती म्हणावे, " हा माझा मुलगा पहिले पासुनच असा आहे. सुरवातीला खुपच काळजी वाटायची. पण नंतर हळूहळू लक्षात आलं की काळजी करुन काहीच उपयोग नाही. सर्व परमेश्वरावर सोपवलं काळजी करणारा आणि घेणारा पण तोच आहे. आणि बरेचदा अस होतं की काही विचार न करता सुद्धा त्याला जे हव नको ते त्या त्या वेळी आपोआप मनांत येतं ". ती बाई नंतर आपल्या मुलाला घेऊन निघून पण गेली. पण मी मात्र त्याच विचारांत मग्न. दिवसभरांत अनेक वेळा ही घटना मनांत डोकावुन गेली. 

त्या काळांत एक माणुस गेल्या दोन महिन्यांपासून माझ्याकड़े  lower back pain आणि मधुमेह च्या इलाजासाठी यायचा. सोबत दहावीची परीक्षा दिलेल्या आपल्या मुलीला पण घेऊन यायचा. तिच अचानकच वजन वाढू लागल होत. दोघांनाही चेक केल. माणसाची तर clear case वाटत होती. मुलीची आईपण आली होती. तीच्या आईला विचारलं, " थाईराइड आहे का. मासिक पाळीचा त्रास वगैरे." तिने सांगितले, " थाईराइड बद्दल माहीत नाही पण डाॅक्टर नी सांगितलं,  PCOS ची समस्या आहे." तिला acupressure ने चेक केल. तर लक्षात आलं… थाईराइड नाही. पण मासिक पाळीची समस्या आहे. दोघांवरही योगासन आणि  acupressure यांचा उपचार सुरु केला. या दोन महिन्यांत त्याचा मधुमेह आणि मुलीच वजन control मध्ये येवू लागल होतं. पण त्याचं lower back pain! दोन चार दिवस बर वाटायचं. पण पुन्हा सुरु.. Spine आणि कमरेपासच्या मसलस् करता anatomy for yoga अनेक वेळा रेफर केली. 

मी परेशान होतो. किती जणांच back pain बर झालं. याचं कां होत नाही.? 

आणि झोपायच्या वेळी एकदम ट्यूब लाइट पेटली. सकाळची घटना अचानक ताजी झाली. आणि विचार आला. कां एवढा विचार करायचा. कां यांत इतकं गुंतायचं. कां न सर्व देवावर सोपवून द्यायचं त्या बाईसारखं. आणि एकदम शांत वाटलं. 

नंतर शनिवार रविवार असल्याने मी पार्क मध्ये गेलोच नाही. शनिवार रविवारी माझं cycling आणि long walk असायचं. सोमवारी पार्क मध्ये नेहमी प्रमाणे गेलो. तो माणूस पण कांही वेळांनी आला. त्याला विचारलं, " काय ठीक आहे नं." तो म्हणाला, " काल खूपच त्रास झाला." म्हटलं, "दोन दिवस काहीच केलं नसेल." तो म्हणाला, " हो. गुरुजी तुम्ही येत नाही तर मी पण आराम केला." खर सांगायचं म्हणजे मी असलो की सर्वांकडून काळजी पूर्वक आणि थोड़ा जास्तच ताण देवून आसनं करुन घ्यायचो. त्यामुळे मी नसलो की सर्वांनाच हायस वाटत असावं.

तर warm up झाल्यावर मी त्याला  mat वर पालथ झोपायला सांगितलं. त्याची spine पून्हा एकदा चेक केली. It was ok. आणि काहीही डोक्यांत नसतांना एकदम मी त्याला प्रश्न विचारायला सुरु केलं. " खरच तुला कमरे पाशी दुखते कां? कोणत्या बाजूला? "

तो म्हणाला, " खरचं दुखतयं गुरुजी, उजव्या बाजूला." मग मी बोटांनी त्या बाजूला दाबायला सुरु केलं. एका ठिकाणी दाब दिल्यावर तो म्हणाला,"हो इथेच." मग विचारलं, " या पायांत पण दुखतं का? " हो म्हणाला तो. आणि एकदम माझी ट्यूब पेटली.. अरे. हा तर सायटिका. मग  जवळ जवळ अर्धा तास त्यानुसार रोगोपचार केले..   Acupressure च्या वेळी कधी कधी तो दु:खानी ओरडायचा पण. प्राणायाम वगैरे झाल्यावर त्याला walking track वर एक चक्कर मारायला सांगितलं. त्याला खुपच बर वाटत होत. त्याला सांगितल्याप्रमाणे रोज तो सर्व करायचा. मी फक्त मधून मधून लक्ष ठेवत होतो. मुलीची शाळा काॅलेज सुरु झाल्याने तिने येणे बंद केले पण घरी करत होती.. 

गुरु पौर्णमेच्या दिवशी त्यानी surprise च दिलं. खुपशे  फळं आणि वेगवेगळी कुकीज़ आणि बरच काहीसं आणून दिलं.. मला हे असं काहीच आवडत नाही. मी काहीच स्विकारायला तयार नव्हतो. मला एकदम कसतरीच वाटायला लागलं. तो म्हणाला, " मी एकदम ठीक झालो आहे. तुम्ही कोणतीच फी घेत नाही. तर हे फळं आणि कुकीज़ तरी घ्या.. " शेवटी नाईलाजेस्तव एवढच स्विकारलं. 

सध्या करोना मुळे मी पार्क मध्ये जाण बंद केलं. पण १५-२० दिवसांपूर्वी सकाळी दूध घेवून येत असतांना त्याची रस्त्यात भेट झाली. आणि त्यानी रस्त्यांत चक्क लोटांगणच घातलं न. मी एकदम स्टंट झालो. त्यानी सांगितलं की त्याची मुलगी एकदम ठीक झाली आहे.. 

मला हे सर्व आत्ता आठवायच कारण. आपला १२ व्या अध्यायाचा स्वाध्याय सुरु आहे. आठव्या श्लोकावर निरूपण करतांना माउली म्हणतात, 

" अगा मानस हे एक। माझ्या स्वरूपीं सवृत्तिक। करूनि घाली निष्टंक। बुद्धि निश्चयेंसी।। 

त्यावेळी मन बुद्धी परमेश्वरावर सोपवून शांत राहिलो म्हणूनच तर हे झालं नं. आता ज्ञानेश्वरी मूळे अहंकार पण थोडा थोडा कमी होऊ लागला आहे.. 

। । सद्गुरू महाराज की जय ।। 

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099