अध्याय १३ : ओव्या ४६०-५११

१९  जुलै २०२० निरुपण 
अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ७ / ज्ञानेश्वरी ओव्या ४६०-५११  )




ह्याचे explanation निरुपणाच्या शेवटी केले आहे 











परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु । तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके ॥ ४६१ ॥
म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे । आंग मन जैसें । कापुराचें ॥ ४६२ ॥
कां रत्नाचें दळवाडें । तैसें सबाह्य चोखडें । आंत बाहेरि एकें पाडें । सूर्यु जैसा ॥ ४६३ ॥
बाहेरीं कर्में क्षाळला । भितरीं ज्ञानें उजळला । इहीं दोहीं परीं आला । पाखाळा एका ॥ ४६४ ॥
मृत्तिका आणि जळें । बाह्य येणें मेळें । निर्मळु होय बोलें । वेदाचेनी ॥ ४६५ ॥
भलतेथ बुद्धीबळी । रजआरिसा उजळी । सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया ॥ ४६६ ॥
किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारीं । आणि ज्ञानदीपु अंतरीं । म्हणौनि शुद्ध ॥ ४६७ ॥
एऱ्हवीं तरी पंडुसुता । आंत शुद्ध नसतां । बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा ॥ ४६८ ॥
मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थीं न्हाणिला । कडुदुधिया माखिला । गुळें जैसा ॥ ४६९ ॥
वोस गृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्नें लिंपिलें । कुंकुमसेंदुर केलें । कांतहीनेनें ॥ ४७० ॥
कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील तें झळाळ । काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण ॥ ४७१ ॥
तैसें कर्मवरिचिलेंकडां । न सरे थोर मोलें कुडा । नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे ॥ ४७२ ॥
म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें । मग बाह्य लाभेल स्वभावें । वरी ज्ञान कर्में संभवे । ऐसें कें जोडे ? ॥ ४७३ ॥
यालागी बाह्य विभागु । कर्में धुतला चांगु । आणि ज्ञानें फिटला वंगु । अंतरींचा ॥ ४७४ ॥
तेथ अंतर बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहलें । किंबहुना उरलें । शुचित्वचि ॥ ४७५ ॥
म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत । जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे ॥ ४७६ ॥
विकल्प जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे । अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती ॥ ४७७ ॥
तें आइके देखे अथवा भेटे । परी मनीं कांहींचि नुमटे । मेघरंगें न कांटे । व्योम जैसें ॥ ४७८ ॥
एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे । परी विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना ॥ ४७९ ॥
भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी । तेथ नातळें तियापरी । राहाटों जाणें ॥ ४८० ॥
कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी । तेथ पुत्रभावाच्या आंगीं । न रिगे कामु ॥ ४८१ ॥
तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पीं सनोळख । कृत्याकृत्य विशेख । फुडें जाणें ॥ ४८२ ॥
पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरळु न शिजे । तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ती ॥ ४८३ ॥
तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण । हें देखसी तेथ जाण । ज्ञान असे ॥ ४८४ ॥
आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें । तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा ॥ ४८५ ॥
देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसींची ॥ ४८६ ॥
वत्सावरूनि धेनूचें । स्नेह राना न वचे । नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग ॥ ४८७ ॥
कां लोभिया दूर जाये । परी जीव ठेविलाचि ठाये । तैसा देहो चाळितां नव्हे । चळु चित्ता ॥ ४८८ ॥
जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवे । भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा ॥ ४८९ ॥
पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा । कां नाहीं जेवीं तरुवरा । येणें जाणें ॥ ४९० ॥
तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं । भूतोर्मी एकी । चळिजेना ॥ ४९१ ॥
वाहुटळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे । तैसा उपद्रव उमाळें । न लोटे जो ॥ ४९२ ॥
दैन्यदुःखीं न तपे । भवशोकीं न कंपे । देहमृत्यु न वासिपे । पातलेनी ॥ ४९३ ॥
आर्ति आशा पडिभरें । वय व्याधी गजरें । उजू असतां पाठिमोरें । नव्हे चित्त ॥ ४९४ ॥
निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी । परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची ॥ ४९५ ॥
आकाश हें वोसरो । पृथ्वी वरि विरो । परि नेणे मोहरों । चित्तवृत्ती ॥ ४९६ ॥
हाती हाला फुलीं । पासवणा जेवीं न घाली । तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं । शेलिला सांता ॥ ४९७ ॥
क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं । कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या ॥ ४९८ ॥
तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं । किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतींही ॥ ४९९ ॥
परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष । ते हे दशा गा देख । देखणया ॥ ५०० ॥
हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे । तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें ॥ ५०१ ॥
आणि इसाळु जैसा घरा । कां दंदिया हतियेरा । न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥ ५०२ ॥
कां एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका । मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥ ५०३ ॥
अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी । नेदी उभें ठाकों द्वारीं । इंद्रियांच्या ॥ ५०४ ॥
म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल । तरि जीवा टेंकैल । म्हणौनि बिहे ॥ ५०५ ॥
बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं ॥ ५०६ ॥
सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें । संयमावरीं करणें । बुझूनि घाली ॥ ५०७ ॥
मनाच्या महाद्वारीं । प्रत्याहाराचिया ठाणांतरीं । जो यम दम शरीरीं । जागवी उभे ॥ ५०८ ॥
आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं । चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त ॥ ५०९ ॥
समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानासी । चित्त चैतन्य समरसीं । आंतु रते ॥ ५१० ॥
अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो । हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पैं ॥ ५११ ॥
जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण । मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो ॥ ५१२ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099