१७ ऑक्टोबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम् । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ ३८॥
आणि विषयेंद्रियां । मेळु होतां धनंजया । जें सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही ॥ ७९४ ॥
अधिकारिया रिगतां गांवो । होय जैसा उत्साहो । कां रिणावरी विवाहो । विस्तारिला ॥ ७९५ ॥
नाना रोगिया जिभेपासीं । केळें गोड साखरेसीं ।कां बचनागाची जैसी । मधुरता पहिली ॥ ७९६ ॥
पहिलें संवचोराचें मैत्र । हाटभेटीचें कलत्र । कां लाघवियाचे विचित्र । विनोद ते ॥ ७९७ ॥
तैसें विषयेंद्रियदोखीं । जें सुख जीवातें पोखी । मग उपडिला खडकीं । हंसु जैसा ॥ ७९८ ॥
तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे । सुकृताचियाही सुटे । धनाची गांठी ॥ ७९९ ॥
आणिक भोगिलें जें कांहीं । तें स्वप्न तैसें होय नाहीं । मग हानीच्याचि घाईं । लोळावें उरे ॥ ८०० ॥
ऐसें आपत्ती जें सुख । ऐहिकीं परिणमे देख । परत्रीं कीर विख । होऊनि परते ॥ ८०१ ॥
जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा । जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ ॥ ८०२ ॥
तेथ पातकें बांधिती थावो । तियें नरकीं देती ठावो । जेणें सुखें हा अपावो । परत्रीं ऐसा ॥ ८०३ ॥
पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें । तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू ॥ ८०४ ॥
पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें । म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं ॥ ८०५ ॥
यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ ३९॥
आणि अपेयाचेनि पानें । अखाद्याचेनि भोजनें । स्वैरस्त्रीसंनिधानें । होय जें सुख ॥ ८०६ ॥
का पुढिलांचेनि मारें । नातरी परस्वापहारें । जें सुख अवतरे । भाटाच्या बोलीं ॥ ८०७ ॥
जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे । जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट ॥ ८०८ ॥
तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा । हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे ॥ ८०९ ॥
ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें । तें हें यथागमें केलें । गोचर तुज ॥ ८१० ॥
ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ । वांचूनि कांहींचि नसे स्थूल । सूक्ष्मीं इये ॥ ८११ ॥
आणि हे तंव त्रिपुटी । तिहीं गुणीं इहीं किरीटी । गुंफिली असे पटीं । तांतुवीं जैसी ॥ ८१२ ॥
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः । सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ ४०॥
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं । न बंधिजे इहीं सत्वादिकीं । तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु ॥ ८१३ ॥
कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा । का जळेंवीण कल्लोळा । होणें आहे ? ॥ ८१४ ॥
तैसें न होनि गुणाचें । सृष्टीची रचना रचे । ऐसें नाहींचि गा साचें । प्राणिजात ॥ ८१५ ॥
यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ । घडलें आहे निखिळ । ऐसें जाण ॥ ८१६ ॥
गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली । चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें ॥ ८१७ ॥
ब्राह्मणक्षत्रियविशां शूद्राणां च परन्तप । कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः ॥ ४१॥
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण । तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां ॥ ८१८ ॥
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी । जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि ॥ ८१९ ॥
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया । तऱ्हीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची ॥ ८२० ॥
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां । शूद्रही कीं देखा । चौथा जाला ॥ ८२१ ॥
जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें । तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती ॥ ८२२ ॥
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था । करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा ॥ ८२३ ॥
जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी । चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती ॥ ८२४ ॥
जिये आत्मप्रकृतीचे इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं । कर्में चौघां चहूं ठाईं । वांटिलीं वर्णा ॥ ८२५ ॥
जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ॥ ८२६ ॥
तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी । केली आहे वर्णीं । चहूं इहीं ॥ ८२७ ॥
तेथ सत्त्वें आपल्या आंगीं । समीन\-निमीन भागीं । दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय ॥ ८२८ ॥
आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविलें वैश्य लोक । रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा ॥ ८२९ ॥
ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा । गुणींचि प्रबुद्धा । केला जाण ॥ ८३० ॥
मग आपुलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे । गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी ॥ ८३१ ॥
तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण । हें सांगों ऐक श्रवण\- । सौभाग्यनिधी ॥ ८३२ ॥
शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ ४२॥
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हातीं । बुद्धि आत्मया मिळे येकांतीं । प्रिया जैसी ॥ ८३३ ॥
ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु । तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा ॥ ८३४ ॥
आणि बाह्येंद्रियांचें धेंडें । पिटूनि विधीचेनि दंडें । नेदिजे अधर्माकडे । कहींचि जावों ॥ ८३५ ॥
तो पैं गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा । आणि स्वधर्माचिया वोजा । जिणें जें कां ॥ ८३६ ॥
सटवीचिये रातीं । न विसंबिजे जेवीं वाती । तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं । वाहणें सदा ॥ ८३७ ॥
तया नाम तप । ते तिजया गुणाचें रूप । आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ ॥ ८३८ ॥
मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अळंकारिलें । ऐसें सबाह्य जियालें । साजिरें जें कां ॥ ८३९ ॥
तया नाम शौच पार्था । तो कर्मीं गुण जये चौथा । आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जें साहाणें ॥ ८४० ॥
ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा । स्वरांमाजीं सुहावा । पंचमु जैसा ॥ ८४१ ॥
आणि वांकडेनी वोघेंसीं । गंगा वाहे उजूचि जैसी । कां पुटीं वळला ऊसीं । गोडी जैसी ॥ ८४२ ॥
तैसा विषमांही जीवां- । लागीं उजुकारु बरवा । तें आर्जव गा साहावा । जेथींचा गुण ॥ ८४३ ॥
आणि पाणियें प्रयत्नें माळी । अखंड जचे झाडामुळीं । परी तें आघवेंचि फळीं । जाणे जेवीं ॥ ८४४ ॥
तैसें शास्त्राचारें तेणें । ईश्वरुचि येकु पावणें । हें फुडें जें कां जाणणें । तें येथ ज्ञान ॥ ८४५ ॥
तें गा कर्मीं जिये । सातवा गुण होये । आणि विज्ञान हें पाहें । एवंरूप ॥ ८४६ ॥
तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रें कां ध्यानबळें । ईश्वरतत्त्वींचि मिळे । निष्टंकबुद्धी ॥ ८४७ ॥
हें विज्ञान बरवें । गुणरत्न जेथ आठवें । आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ॥ ८४८ ॥
पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया । तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया । मार्गमात्रातें ॥ ८४९ ॥
आदरें जें कां मानणें । तें आस्तिक्य मी म्हणें । तो नववा गुण जेणें । कर्म तें साच ॥ ८५० ॥
एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख । तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें ॥ ८५१ ॥
तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा ॥ ८५२ ॥
नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला । कां चंदनु निजें चर्चिला । सौरभ्यें जेवीं ॥ ८५३ ॥
तेवीं नवगुणटिकलग । लेणें ब्राह्मणाचें अव्यंग । कहींचि न संडी आंग । ब्राह्मणाचें ॥ ८५४ ॥
आतां उचित जें क्षत्रिया । तेंहीं कर्म धनंजया । सांगों ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी ॥ ८५५ ॥
शौर्यं तेजो धृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनम् । दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम् ॥ ४३॥
तरी भानु हा तेजें । नापेक्षी जेवीं विरजे । कां सिंहें न पाहिजे । जावळिया ॥ ८५६ ॥
ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु । सावायेंवीण उद्भटु । ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण ॥ ८५७ ॥
आणि सूर्याचेनि प्रतापें । कोडिही नक्षत्र हारपे । ना तो तरी न लोपे । सचंद्रीं तिहीं ॥ ८५८ ॥
तैसेनि आपुले प्रौढीगुणें । जगा या विस्मयो देणें । आपण तरी न क्षोभणें । कायसेनही ॥ ८५९ ॥
तें प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मीं गुण दुजा । आणि धीरु तो तिजा । जेथींचा गुण ॥ ८६० ॥
वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस । झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथें ॥ ८६१ ॥
आणि पाणी हो कां भलतेतुकें । परी तें जिणौनि पद्म फांके । कां आकाश उंचिया जिंके । आवडे तयातें ॥ ८६२ ॥
तेवीं विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणें जें ॥ ८६३ ॥
तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख । आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण ॥ ८६४ ॥
आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे । तेवीं समोर शत्रूपुढें । होणें जें कां ॥ ८६५ ॥
माहेवणी प्रयत्नेंसी । चुकविजे सेजे जैसी । रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणीं ॥ ८६६ ॥
हा क्षत्रियाचेया आचारीं । पांचवा गुणेंद्रु अवधारीं । चहूं पुरुषार्थां शिरीं । भक्ति जैसी ॥ ८६७ ॥
आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसीं मोकळे । कां उदार परीमळें । पद्माकरु ॥ ८६८ ॥
नाना आवडीचेनि मापें । चांदिणें भलतेणें घेपे । पुढिलांचेनि संकल्पें । तैसें जें देणें ॥ ८६९ ॥
तें उमप गा दान । जेथ सहावें गुणरत्न । आणि आज्ञे एकायतन । होणें जें कां ॥ ८७० ॥
पोषूनि अवयव आपुले । करविजतीं मानविले । तेवीं पालणें लोभविलें । जग जें भोगणें ॥ ८७१ ॥
तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो । तो गुणांमाजीं रावो । सातवा जेथ ॥ ८७२ ॥
ऐसें जें शौर्यादिकीं । इहीं सात गुणविशेखीं । अळंकृत सप्तऋखीं । आकाश जैसें ॥ ८७३ ॥
तैसें सप्तगुणीं विचित्र । कर्म जें जगीं पवित्र । तें सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचें ॥ ८७४ ॥
नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु । म्हणौनि गुणस्वर्गां आधारु । सातां इयां ॥ ८७५ ॥
नातरी सप्तगुणार्णवीं । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥ ८७६ ॥
कां गुणांचे सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं । तया महोदधीचिया आंगीं । विलसे जैसी ॥ ८७७ ॥
परी हें बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक । कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी ॥ ८७८ ॥
आतां वैश्याचिये जाती । उचित जे महामती । ते ऐकें गा निरुती । क्रिया सांगों ॥ ८७९ ॥
कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् । परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम् ॥ ४४॥
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु । घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें ॥ ८८० ॥
किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें । कां समर्घीची विकणें । महर्घीवस्तु ॥ ८८१ ॥
येतुलाचि पांडवा । वैश्यातें कर्माचा मेळावा । हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण ॥ ८८२ ॥
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्में तिन्ही वर्ण । ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म ॥ ८८३ ॥
पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाहीं शूद्रातें । एवं चतुर्वर्णोचितें । दाविलीं कर्में ॥ ८८४ ॥
No comments:
Post a Comment