अध्याय ६: ओव्या १-५१

२८ जुलै  २०१८ निरुपण 
अध्याय ६: ध्यानयोग  (गीता श्लोक १/ ज्ञानेश्वरी ओव्या १-५१)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥  श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावा । ।
। ध्यानयोगः ।

मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥ १ ॥
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥ २ ॥
कैसी दैवाची आगळिक नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥ ३ ॥
तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जे आडमुठीं तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूतें ॥ ४ ॥
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥ ५ ॥
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एर्‍हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ॥ ६ ॥
परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधु कैसें पाहेल । तेवींचि ये रुसें घेईल । म्हणौनि बिहे ॥ ७ ॥
परि आपण चित्तीं आपुला । निकियापरी संतोषला ।जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥ ८ ॥
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें ।आतां आदरेंसीं बोलणें । घडेल तया ॥ ९ ॥
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा ।जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥ १० ॥
तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार ।नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥ ११ ॥
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें ।जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥ १२ ॥
तो अध्यावो सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥ १३ ॥
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥ १४ ॥
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचें रंग थोडे ।वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥ १५ ॥
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥ १६ ॥
सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥ १७ ॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळयांही पुरों लागे धणी ।ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ॥ १८ ॥
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ॥ १९ ॥
ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥ २० ॥
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ २१ ॥
हें असोतु या बोलांचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥ २२ ॥
आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी ।जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ॥ २३ ॥
येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतयां होआवें लागे ।हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥ २४ ॥
आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे ।मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचि माजीं ॥ २५ ॥
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल ।एर्‍हवीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥ २६ ॥
परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें ।जे अधिकारिये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥ २७ ॥
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी ।तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥ २८ ॥
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा प्राकृतीं हा ग्रंथु नेणिजे ।आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥ २९ ॥
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो ।म्हणौनि बोलावया विषय पहा हो । विशेषु नाहीं ॥ ३० ॥
परी अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे ।आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥ ३१ ॥
तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणौनि बोलीं विपायें सांपडे ।परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखैन मी ॥ ३२ ॥
जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे ।जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ ३३ ॥
ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे ।जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥ ३४ ॥
तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन ।अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥ ३७ ॥
म्हणौनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु ।तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥ ३८ ॥
श्रीभगवानुवाच ।
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः । स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १॥

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानीं । एर्‍हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥ ३९ ॥
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ॥ ४० ॥
जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहींमार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥ ४१ ॥
नातरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥
आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ॥ ४३ ॥
जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥ ४४ ॥
तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥ ४५ ॥
तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥ ४६ ॥
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥ ४७ ॥
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडावें बद्धक । तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥ ४८ ॥
जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥ ४९ ॥
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥ ५० ॥
म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥ ५१ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099