२६ डिसेंबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
सर्वगुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः । इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम् ॥ ६४॥
तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ । वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां ॥ १३४१ ॥
हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे । तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें ॥ १३४२ ॥
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया । कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी ॥ १३४३ ॥
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे । काय दैवें न सांपडे । सानुकूळें ? ॥ १३४४ ॥
येऱ्हवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं । भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें ॥ १३४५ ॥
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा । तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें ॥ १३४६ ॥
आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया । तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें ॥ १३४७ ॥
तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें । माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा ॥ १३४८ ॥
म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज । हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन ॥ १३४९ ॥
पैम् जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता । कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें ॥ १३५० ॥
तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं । तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं ? ॥ १३५१ ॥
म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें । तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक ॥ १३५२ ॥
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ॥ ६५॥
तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा । मज व्यापकातें वीरा । विषयो करीं ॥ १३५३ ॥
आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा । तूं सर्व कर्मीं तैसा । मजसींचि आस ॥ १३५४ ॥
किंबहुना आपुलें मन । करीं माझें एकायतन । माझेनि श्रवणें कान । भरूनि घालीं ॥ १३५५ ॥
आत्मज्ञानें चोखडीं । संत जे माझीं रूपडीं । तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी ॥ १३५६ ॥
मीं सर्व वस्तीचें वसौटें । माझीं नामें जियें चोखटें । तियें जियावया वाटे । वाचेचिये लावीं ॥ १३५७ ॥
हातांचें करणें । कां पायांचें चालणें । तें होय मजकारणें । तैसें करीं ॥ १३५८ ॥
आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा । तेणें यज्ञें होईं बरवा । याज्ञिकु माझा ॥ १३५९ ॥
हें एकैक शिकऊं काई । पैं सेवकें आपुल्या ठाईं । उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करीं ॥ १३६० ॥
तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु । ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तूं माझा ॥ १३६१ ॥
मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु । होऊनि ठायील एकांतु । आम्हां तुम्हां ॥ १३६२ ॥
तेव्हां भलतिये आवस्थे । मी तूतें तूं मातें । भोगिसी ऐसें आइतें । वाढेल सुख ॥ १३६३ ॥
आणि तिजें आडळ करितें । निमालें अर्जुना जेथें । तें मीचि म्हणौनि तूं मातें । पावसी शेखीं ॥ १३६४ ॥
जैसी जळींची प्रतिभा । जळनाशीं बिंबा । येतां गाभागोभा । कांहीं आहे ? ॥ १३६५ ॥
पैं पवनु अंबरा । कां कल्लोळु सागरा । मिळतां आडवारा । कोणाचा गा ? ॥ १३६६ ॥
म्हणौनि तूं आणि आम्हीं । हें दिसताहे देहधर्मीं । मग ययाच्या विरामीं । मीचि होसी ॥ १३६७ ॥
यया बोलामाझारीं । होय नव्हे झणें करीं । येथ आन आथी तरी । तुझीचि आण ॥ १३६८ ॥
पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें । प्रीतीची जाति लाजणें । आठवों नेदी ॥ १३६९ ॥
येऱ्हवीं वेद्यु निष्प्रपंचु । जेणें विश्वाभासु हा साचु । आज्ञेचा नटनाचु । काळातें जिणें ॥ १३७० ॥
तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हितीं बापु । मा आणेचा आक्षेपु । कां करावा ? ॥ १३७१ ॥
परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाचीं बिरुदें । सांडिलीं गा मी हे आधें । सगळेनि तुवां ॥ १३७२ ॥
पैं काजा आपुलिया । रावो आपुली आपणया । आण वाहे धनंजया । तैसें हें कीं ॥ १३७३ ॥
तेथ अर्जुनु म्हणे देवें । अचाट हें न बोलावें । जे आमचें काज नांवें । तुझेनि एके ॥ १३७४ ॥
यावरी सांगों बैससी । कां सांगतां भाषही देसी । या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ? ॥ १३७५ ॥
कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु । तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥ १३७६ ॥
पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर । वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं ॥ १३७७ ॥
म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया । प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी ॥ १३७८ ॥
तंव देवो म्हणती राहें । या बोलाचा प्रस्तावो नोहे । पैं मातें पावसी उपायें । साचचि येणें ॥ १३७९ ॥
सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया । तेणें विरेचि कीं उरावया । कारण कायी ? ॥ १३८० ॥
तैसें सर्वत्र मातें भजतां । सर्व मी होतां अहंता । निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी ॥ १३८१ ॥
एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारीं । दाविली तुज उजरी । उपायांची ॥ १३८२ ॥
जे आधीं तंव पंडुसुता । सर्व कर्में मज अर्पितां । सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी ॥ १३८३ ॥
पाठीं माझ्या इये प्रसादीं । माझें ज्ञान जाय सिद्धी । तेणें मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपीं माझ्या ॥ १३८४ ॥
मग पार्था तिये ठायीं । साध्य साधन होय नाहीं । किंबहुना तुज कांहीं । उरेचि ना ॥ १३८५ ॥
तरी सर्व कर्में आपलीं । तुवां सर्वदा मज अर्पिलीं । तेणें प्रसन्नता लाधली । आजि हे माझी ॥ १३८६ ॥
म्हणौनि येणें प्रसादबळें । नव्हे झुंजाचेनि आडळें । न ठाकेचि येकवेळे । भाळलों तुज ॥ १३८७ ॥
जेणें सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये । तें उपपत्तीचेनि उपायें । गीतारूप हें ॥ १३८८ ॥
मियां ज्ञान तुज आपुलें । नानापरी उपदेशिलें । येणें अज्ञानजात सांडी वियालें । धर्माधर्म जें ॥ १३८९ ॥
No comments:
Post a Comment