धनश्री कुलकर्णी स्वाध्याय

२१ जुलै, मंगळवार

 भक्ती म्हणजे नक्की काय? त्याच्या आड कोणत्या गोष्टी येतात ? भक्ती कशी करता येईल? योगमार्ग आणि भक्ती मार्ग मध्ये नक्की काय फरक आहे ? अनन्य भक्ताची लक्षणे काय आहेत ? भगवंत भक्तासाठी काय काय करतो? भगवंताचा अनन्य भक्त कोण होऊ शकतो? भक्त कशा पद्धतीने जीवन जगतो ?

भक्तियोग स्वाध्याय मध्ये वरील प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या.

 विभक्त म्हणजे separate आणि भक्त म्हणजे inseparable.

आपण एखाद्या गोष्टी पासून inseparable तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्या गोष्टी बद्दल आपल्या मनात प्रचंड प्रेम उत्पन्न होतं. भगवंताबद्दल अंतःकरणात असे जे प्रेम आहे त्या प्रेमाला भक्ती म्हणता येईल. मनुष्याला अनेक गोष्टींचे प्रेम असते जसे पैसा, सत्ता, प्रसिद्धी वगैरे. जगावर प्रेम करणाऱ्या त्याच्या ह्या स्वभावाला लोभ, मोह म्हणता येईल. जगावर कितीही प्रेम केले तरी जीवाची तळमळ शांत होत नाही. जगावर प्रेम करणे म्हणजे भोगात गुंतणे आणि भगवंतावर प्रेम करणे म्हणजे भक्तीत रंगणे. जोपर्यंत जीव ईश्वराधीन होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णतः आनंद, समाधान मिळत नाही. श्रीमहाराज म्हणाले, जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे.

 लहानपणी हनुमानाचे एक चित्र बघून फार गम्मत वाटायची ज्यात तो छाती फाडून त्यात राम आणि सीता आहे असे दाखवतो. तेव्हा वाटायचे खरंच असे असेल का? आज लक्षात येते कि ते फक्त symbolic आहे. त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त राम आहे. जे पिंडी ते ब्रह्माण्डी. आमच्या पिंडात विकार असल्याने जगातही विकार दिसतात. पण हनुमानाला रामाबद्दल अमर्याद प्रेम आहे. हनुमानाने स्वतःला रामाच्या प्रेमात पूर्णपणे झोकून दिले, आणि रामाचा भक्त ह्याशिवाय दुसरे कोणतेच अस्तित्व ठेवले नाही. हीच( आपले स्वतः चे अस्तित्व मिटवणे) परम प्रेमाची स्तिती आहे. परमभक्त हनुमान श्रीरामास म्हणतो

देहबुद्ध्या तु दासोऽस्मि जीवबुद्ध्या त्वदंशकः। आत्मबुद्ध्या त्वमेवाहमिति मे निश्चिता मतिः॥

देहबुद्धीने मी तुझा दास आहे. जीवबुद्धीने मी तुझा अंश आहे आणि आत्मरूपाने तू मी आहेस आणि मी तू आहेस, असा माझा निश्चित निर्णय आहे.

सर्व संत सांगतात चराचरात राम पहा. पण आम्हाला तसे दिसत नाही. फक्त दगडात आणि आवडत्या लोकांमध्ये राम पाहणे खूप सोपे जाते. कारण दगड प्रतिक्रियाच व्यक्त करत नाही आणि आवडते लोक माझ्या मनाला आवडेल अशीच प्रतिक्रिया देतात (In fact म्हणूनच ते आवडतात ) मग चराचरात राम कसा बघायचा? श्री महाराज म्हणाले आधी स्वतः मध्ये राम पहा. राम स्वतः मध्ये दिसला कि मग चराचरात पण राम पाहण्याची दृष्टी येईल.  

मग आता स्वतः मध्ये राम बघण्याची काय process आहे ? स्वतः मध्ये राम तेव्हाच बघता येईल जेव्हा आपले अंतःकरण पूर्णपणे शुद्ध होईल. आणि अंतःकरण शुद्ध करण्यासाठी भगवंताचे अखंड स्मरण करणे, येन केन प्रकाराने त्याचे अखंड अनुसंधान ठेवणे हा एकमेव मार्ग आहे. मनाला शुद्ध करण्यासाठीच सगळ्या साधना, सर्व योग, भजनपूजन, जप, पारायण, तीर्थयात्रा, भगवदगुण संकीर्तन, उपासना सांगितलेल्या आहेत.

अनन्य भक्त कसा असतो हे आपण उद्या बघू.

जानकी जीवन स्मरण जय जय राम

२२ जुलै

 जग बदलावे म्हणजे प्रपंच आणि मी बदलावे ( जेणे करून माझे समाधान, आनंद intact राहील) म्हणजे परमार्थ. ज्या दिवसापासून मनुष्य स्वतःच्या मनावर काम करायला सुरुवात करतो त्या दिवसापासून त्याचा पारमार्थिक प्रवास सुरु होतो. 

 परमेश्वराने (supreme ruler) हे ब्रह्माण्ड निर्माण केले. प्राणिमात्र, जीवजंतू आणि मनुष्य निर्माण केले. परमेश्वराने मनुष्याला हवे ते कर्म करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले. ते कर्म करण्यासाठी बुद्धी, शक्ती, भांडवल, सामर्थ्य, योग्यता प्रदान केली. पण एक department मात्र त्याने स्वतःकडे संपूर्णपणे राखून ठेवले. ते म्हणजे मनुष्याने केलेल्या कर्माचे त्याला काय फळ मिळेल ह्याचे सर्व अधिकार त्याने स्वतःकडे ठेवले. All rights of allocating results are exclusively reserved with him. म्हणून कर्मयोग समजावून सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, तू कर्मफळाची अपेक्षा करू नको. फक्त कर्म कर ते हि निष्काम भावाने आणि केलेले प्रत्येक कर्म मला अर्पण कर. निष्काम भावाने म्हणजे त्या कर्माच्या फळाची आशा न करता. कारण भगवंत म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा कर्म करण्यावर अधिकार आहे. फळ काय मिळावे ह्यावर तुझा अधिकार नाही. मनुष्य त्रागाच मुळात ह्यासाठी करतो कि मनासारखे results मिळत नाही. मनासारखे घडत नाही. पण हि गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे कि ती गोष्ट आपल्या आवाक्यात नाही. फक्त प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. 

एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला विचारले आपल्या मुलावर प्रेम कसे करावे. ती म्हणाली मला तसे सांगता येणार नाही पण एवढे सांगू शकते कि तुला मूल झाले कि ते आपोआप कळेल. 

प्रेम कसे करावे हे काही शब्दात सांगता येत नाही. म्हणून गीतेत/ भक्तियोग अध्यायात सुद्धा भक्ती कशी करावी हे सांगितलेले नाही. पण अंतःकरणात भक्ती कशाने निर्माण होते हे सांगितले आहे. सुरुवातीच्या अध्यायमध्ये (१२ व्या अध्यायच्या आधी) भक्ती कशाने निर्माण होते ते सांगितले आहे आणि भक्तियोग अध्यायमध्ये ज्ञान प्राप्त झालेल्या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. भगवंताच्या सानिध्यात राहिले कि त्याचे प्रेम लागते. त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी गीतेत वेगवेगळे योग (योग म्हणजे जोडल्या जाणे) सांगितले आहेत. कर्मयोग, ध्यानयोग, सांख्ययोग, ज्ञानयोग, विभूतियोग ह्या कोणत्याही मार्गाने परमेश्वराशी जोडल्या जाता येते. हे सगळे योग एवढ्यासाठीच आहेत कि कोणत्याही मार्गाने आपण त्याच्या सानिध्यात राहू शकतो.

कर्मयोग म्हणजे कर्माच्या माध्यमातून परमेश्वराशी जोडल्या जाणे. कोणतेही कर्म करतांना ते भगवंताला अर्पण करायचे. ते निष्काम, निस्वार्थी, निरहंकारी आणि निरपेक्ष भावाने करायचे. कर्म करताना असा भाव टिकत असेल तर त्याचे फळ म्हणून भगवंत आपले चित्त शुद्ध करण्याचे कार्य करतो. जेवढे चित्त शुद्ध होईल त्या प्रमाणात अंतःकरणात भक्ती निर्माण होईल. भक्ती हे साधनेचे फळ आहे. Bhakti is a byproduct of spiritual practice म्हणून goal भक्ती कशी निर्माण होईल हा ठेवायचा नसून साधना कशी करावी व कशी वाढवावी ह्याकडे असावा. मन सहजतेने साधना करायला तयार होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मनाला साधनेची सवय आणि आवड निर्माण होत नाही तोपर्यंत मनाला साधनेला बसण्याची बळजबरी करावी लागते. आता अंतःकरणात निर्माण झालेली हि भक्ती देवाकडे काही मागून वाया घालवू नये. जो अनन्य भक्त असतो तो पुन्हा देवाला त्याचे प्रेम लागू दे एवढेच मागतो. भगवंत सोडून त्याला दुसरे काहीही नको असते. अगदी मुक्तीची सुध्दा तो अपेक्षा करत नाही.  तो कोणत्याही कर्मफळाची अपेक्षा करत नाही. १२व्या अध्याय मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जो आपले चित्त पूर्णपणे भगवंताला अर्पण करतो. त्यांची कायिक, वाचिक, मानसिक ह्या गोष्टींची माझ्याशिवाय अन्य ठिकाणी धाव नसते, ज्यांच्या प्रिय व्यवहाराला मीच एक स्थान असतो, ज्यांनी देह, मन, बुद्धी सगळेकाही भगवंताला अर्पण केले, कर्मफळ त्याग करणे हा सर्व योगातला सगळ्यात श्रेष्ठ योग आहे असा योग ज्यांनी केला आहे, ते अनन्य भक्त मला सर्वात जास्त प्रिय आहेत. हि ज्ञानी भक्तांची लक्षणे सांगितली आहेत.      

असा अनन्य आणि ज्ञानी भक्त मुक्तीची पण अपेक्षा करत नाही. त्याच्या ह्या निस्सीम आणि निरपेक्ष भक्तीचे फळ म्हणून भगवंत त्याला सर्व कर्मबंधनातून मुक्त करतो, मुक्ती देतो. Mukti, moksha is a byproduct of अनन्य  bhakti. अशा अनन्य भक्तासाठी भगवंत काय काय करतो हे आपण उद्या बघू.

लक्ष्मणरेषा हि फक्त सीतेसाठी नव्हती तर प्रत्येकाने आपली लक्ष्मणरेषा काढावी. आपले syllabus तयार करावे. समाधान intact ठेवावे.

पु.दत्ता काका

२३ जुलै

वासनेचा जोर मोठा विलक्षण असतो. जीवाला तिचे वेष्टन पडते म्हणून तिच्यापासून त्रास होतो. हे कळले तरी तिला टाळणे कठीण होऊन बसते. (संदर्भ: श्री गोंदवलेकर महाराज चरित्र)

 सहाव्या अध्याय मध्ये पण भगवंत अर्जुनाला सांगतात,

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ||

भगवंत अर्जुनाला सांगतात, मनाला आवर घालणे खूप कठीण आहे  ह्यात काही संशय नाही पण अभ्यासाने आणि वैराग्याने (detachment) ते प्राप्त होऊ शकतं.

ह्याचे एक उदाहरण बघू.

समाजा एका मनुष्याला गुलाबजाम खूप आवडतात. त्याला सतत गुलाबजाम खाण्याचा ध्यास लागतो आणि समोर गुलाबजाम आले तर खूप खाल्ले जातात. खाताना ते control केले जात नाही आणि १५ ते २० गुलाबजाम तो खातो. नंतर त्याला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होतो. असे अनेक दिवस घडते. एक दिवस त्याला लक्षात येतं कि हे काही बरोबर नाही. ह्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मग एक दिवस तो दृढ संकल्प करून ठरवतो कि आजपासून फक्त दहाच गुलाबजाम खायचे आणि त्याला हे जमतं. पुन्हा काही दिवसांनी ते गुलाबजाम तो ५ पर्यंत आणतो, मग २, मग १ पर्यंत आणतो. हळूहळू त्याची गुलाबजाम खाण्याची वासना कमी कमी होत जाते. इथे त्याने गुलाबजाम कमी खाण्याचा आणि त्याच्याप्रती वैराग्य भाव ठेवला. मग एक दिवस असा येतो ज्या दिवशी त्याची ह्या अभ्यासाची आणि वैराग्याची पूर्णाहुती होते आणि त्या मंनुष्याची गुलाबजाम मधील वासना पूर्णपणे नष्ट होते. त्यानंतर गुलाबजाम समोर आला तरी सुद्धा त्याच्या मनात कोणतीही वृत्ती उठत नाही. हि झाली त्याला गुलाबजाम खाण्याच्या वासनेपासून मिळालेली मुक्ती (कोणतीही वृत्ती न उठणे). अभ्यासाची आणि वैराग्याची पूर्णाहुती झाल्यानंतर सहजावस्था प्राप्त होते.

अंतःकरणातील दडून बसलेल्या प्रत्येक वासनेपासून सुटका होणे म्हणजे मुक्ती. मुक्ती/मोक्ष हि अतिशय परम आनंदाची अवस्था आहे. जीवाला अशा प्रत्येक वासनेतून सुटावे लागते. ती एक दोन दिवसांत आत्मसात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी भगवंत वेळोवेळी सद्गुरुरूपात आपल्यासाठी धावून येतात. भगवंत गीतेत सांगतात कि अनन्य भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. म्हणजे त्यांच्या प्रपंचातील संकटात त्यांना धीर देऊन त्यांचे समाधान टिकवण्याचे काम करतो, परमार्थातील साधनेला शक्ती पुरवतो, साधना करण्यासाठी देहाची आणि मनाची अवस्था सांभाळतो, साधनेसाठी देह आणि मन ह्याचे ऐक्य घडवून आणतो (कारण कधी कधी साधनेसाठी मन तयार असतं पण देहाचे विकार त्रास देतात तर कधी कधी देह चांगल्या अवस्थेत असतो पण मन तयार होत नाही) , वेळोवेळी साधकाला सद्सद्विवेकबुद्धी प्रदान करून प्रपंचातील आणि परमार्थातील संकटे येण्याआधीच त्यांना सावध करतो, साधक कुठे अडखळला तर त्याला त्यातून हळूच बाहेर काढतो आणि विकारांमधून त्याची सुटका करतो. ह्याचे एक उदाहरण बघू.

श्रीआनंदसागर महाराज हे श्री गोंदवलेकर महाराजांचे सत्शिष्य आहेत. एकदा श्री महाराजांनी आनंदसागराना सांगितले कि रोज जेवायला बसायच्या आधी गीतेचा १५ वा अध्याय म्हणावा आणि त्याप्रमाणे आनंदसागरांनी सुरु केले. एकदा ते गोंदवले येथे आले होते. श्रीमहाराजांनी स्वतः पंगत वाढायला सुरुवात केली आणि पंगतीत लोकांना जेवायला बसायची खूप घाई केली, आनंदसागरानाही पानावर जेवायला बसवले. पंगत सुरु झाली. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. आनंदसागरांनी पण जेवायला सुरुवात केली. मग त्यांच्याजवळ जाऊन हळूच श्रीमहाराज म्हणाले आज गीतेचा १५ वा अध्याय म्हणायचा राहिला का? त्यावेळी आनंदसागरांच्या लक्षात आले इतके दिवस श्री महाराजांच्या कृपेने आपली साधना सुरु होती. अशा पद्धतीने "मी साधन करतो म्हणून ते होते" हा अहंकाराचा सूक्ष्म काटा श्री महाराजांनी त्यांच्या अंतःकरणातून उपटून काढला.

१२ व्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताला भगवंत कसे सांभाळतात ते सांगितले आहे. ते म्हणतात त्यांचे जे जे काम पडेल ते ते सर्व मी करतो, त्यांना मृत्यूचा त्रास न व्हावा ह्याची मी हमी घेतली आहे, त्यांच्यावर संकट आले तर मी त्यांची लाज राखतो, त्यांना मी वैकुंठाचे अधिकारी करतो. माझ्या भक्तांना कधीही चिंता नसते कारण मी सदैव त्यांच्या मदतीसाठी तयार असतो.

 एका दिवसात/ महिन्यात अनन्य भक्त किंव्हा ज्ञानी भक्त होता येत नाही. There is no shortcut for it. हा सतत चा अभ्यास आहे. कारण आपल्या आत अनेक जन्मांच्या वासना घर करून बसलेल्या आहेत आणि वासना (इच्छा) अतिशय बळकट आणि चिवट असतात. १२ व्या अध्याय मध्ये साधकाच्या दृष्टीने एक खूप महत्वाचा योग सांगितला आहे, तो म्हणजे अभ्यासयोग. हा अभ्यासयोग करण्याच्या भगवंतांनी काय guidelines दिल्या आहेत ते आपण उद्या बघू. 

मी केले, माझे घर असे न म्हणता आम्ही केले आमचे घर असे म्हणावे. ते ऐकायला गोड वाटते.

पू. दत्ता काका

जानकी जीवन स्मरण जय जय राम

२४ जुलै २०२०

श्रीराम🙏🏻

अभ्यासयोग म्हणजे अभ्यासाच्या साहाय्याने भगवंताशी जोडणे. अभ्यास करायचा म्हणजे आपल्या मनाची quality सतत check करणे आणि जिथे ती अशुद्ध असेल त्या ठिकाणी स्वच्छ करणे. सोनाच्या खाणीतून जसे अशुद्ध सोने काढून हळूहळू त्याचे शुद्ध सोने तयार करतात आणि शेवटी २४ कॅरेट सोन्याची वीट तयार होते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले आपल्या मनातील प्रत्येक विचार scan व्हायला पाहिजे. अभ्यास म्हणजे मनावर काम करणे तेही मनाच्या साहाय्याने. It's like काट्याने काटा काढणे आणि काम झाले कि दोन्ही काटे फेकून देणे. आत्मसाक्षात्कार झाला कि ह्या दोन्ही मनाची गरज उरात नाही. कारण एकदा अभ्यास पूर्ण झाला कि ह्या दोन्ही मनाची जागा भगवंत घेतो. माउलींनी ह्यासाठी एक दृष्टांत दिला आहे, जसे पौर्णिमेनंतर चंद्राचे बिंब हळूहळू कमी कमी होत जाते, आणि अमावास्येला नाहीसे होते, तसे अभ्यासाने मन विषयांपासून निवृत्त होते, आणि भगवंताच्या ठिकाणी प्रेम करणारे चित्त हळूहळू भगवंतच होते. माउली म्हणतात ह्या अभ्यासयोगाने प्राप्त होत नाही असे काहीच नाही.

भगवंत अर्जुनाला सांगतात, तू तुझे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर. समजा, तू मनबुद्धिसहित आपले चित्त जर मला समर्पित करू शकला नाही तर काही क्षण तरी माझे स्मरण करण्याचा अभ्यास कर. ह्या अभ्यासाचे जर तुझ्यात सामर्थ्य नसेल तर तू आचरणाच्या मार्गाचे अवलंबन कर. तू काया, वाचा, मनाने जे कर्म करतो, ते तू स्वतः करतो अशी बुद्धी ठेवू नकोस. ज्या परमात्माच्या साहाय्याने विश्वाचे सर्व व्यापार चालतात, तोच एक कर्ता आहे समज. जे जे काही कर्म घडेल ते सर्व मला अर्पण कर. तुला जर कर्म अर्पण करता आली नाही, तर एक कर, ज्या ज्या वेळी, जी जी कर्मे घडतील, त्या सर्वांच्या फळाची आशा धरू नकोस. कर्मफळ त्याग जरी सोपा वाटत असला, तरी सर्व योगात हा श्रेष्ठ योग आहे. शांती मिळविण्याचा हाच एक मार्ग आहे. तेव्हा अर्जुना अभ्यास हा केलाच पाहिजे.

आपल्या जीवनात जर आनंद, समाधान वाढत असेल, acceptance वाढत असेल, कठीण प्रसंगात मन शांत राहत असेल, खंत कमी झाली असेल, ईश्वराविषयी निष्ठा बळकट होत असेल, शरणागत भाव वाढत असेल, कर्तेपणाचा भाव कमी होत असेल, आंतरिक संघर्ष कमी होत असेल, तक्रार करणे कमी झाले असेल, मनातील विकारांची intensity कमी होत असेल तर आपला अभ्यास बरोबर मार्गाने सुरु आहे असे म्हणण्यास हरकत नाही. साधकाला ह्या अभ्यासाशिवाय गत्यंतर नाही.

 वासनेचा घट्ट पगडा आणि मायेचा विलक्षण जोर ह्या दोन शक्तिशाली अस्त्रांमुळे साधकाचा अभ्यासयोग अवघड होत जातो. साधक सतत अडखळतो, फसतो, अडकतो. परंतु अंतरंगात वसणाऱ्या परमेश्वर भेटीच्या तळमळीची ठिणगी साधकाला पुन्हा पुन्हा वर काढते आणि साधक नवीन जोमाने पुन्हा अभ्यास सुरु करतो. श्रीसद्गुरुंच्या छत्रछायेखाली सुरु असलेल्या अभ्यासयोगाच्या साहाय्याने साधक एक दिवस सिद्ध बनून त्या परब्रह्मापर्यंत पोहचतो.

परंतु मायेला दूर करण्यासाठी आधी ती आपल्या जवळ वास करते आहे कि नाही हे ओळखता आले पाहिजे. ते कसे ओळखायचे, मायेची कोणती लक्षणे आहेत ते आपण उद्या बघू.      

जानकी जीवन स्मरण जय जय राम

प्रत्येक प्रसंगात अगदी शुल्ल्लक वेळीही Thank you Maharaj म्हणण्याची सवय करा.

पु.दत्ता काका

 

२५ जुलै २०२०

जीव म्हणून जन्मलेला प्रत्येकजण मायेने घेरलेला आहे. मायेचे रूप ओळखू न येणे हि बद्धता, त्या रुपाला ओळखून त्यावर कटाक्षाने काम करणे हि साधकाची साधना.

 खाली दिलेली मायेची लक्षणे पु. पेठे काकांच्या निरूपणातून घेतलेली आहेत. ते जसेच्या तसे note down केलेले आहे.  

मायेचे लक्षणे

1. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही मायेत अडकू शकतात. मुलांना अभ्यास करण्याच्या आधी खेळावेसे वाटत असेल तर ते मायेच्या कक्षेत आहेत. अभ्यास केल्यावर खेळायला गेला तर मायेच्या बाहेर आहे. कारण अभ्यास केल्यावर गेला म्हणजे तो आपले कर्तव्य करून मग गेला.

2. अपयशाला दुसरे कोणीतरी कारणीभूत आहे असे वाटणे. मी कारणीभूत आहे असे म्हटले की तो मायेच्या बाहेर आहे.

3. पेपर झाल्यावर यशाची काळजी वाटणे

4. कोणा बद्दल ईर्षा आणि मत्सर वाटणे.

5. मी कोणापेक्षा काहीतरी वेगळा आहे असे वाटणे. मी सर्व सामान्य आहे असे म्हटले की तो मायेच्या बाहेर आहे.

6. दुसर्‍याचे यश किंवा कर्तृत्व याचा मनापासून आनंद घेता येत नसेल तर

7. स्थान आणि मान मनाला हवासा वाटत असेल तर

8. कशाही पुढे( सुखाने किंवा दु:खाने) देवाचा विसर पडला तर

9. प्रेमापेक्षा प्रसिद्धी आणि मानासाठी काही करावेसे वाटले तर

10. कशाचीही काळजी वाटली तर. ( नळाला पाणी येत नाही येथपासून ते मुक्ती पर्यंत). नळाला पाणी येण्यासाठी प्रयत्न करा. मुक्तीसाठी प्रयत्न करा. पण काळजी केली की माया त्याला पकडते.

11. स्वधर्म करायचा कंटाळ आला तर

12. कशाही पेक्षा पैसा मोठा वाटायला लागला तर

13. देवाच्या कर्तृत्वाबद्दल,  अस्तित्वाबद्दल आणि कृपेबद्दल संदेह निर्माण झाला तर

14. भविष्याच्या चिंतेने संग्रह करायला लागला तर

15. देवाने दिलेल्या बुद्धी बद्दल अहंकार निर्माण झाला तर. माणसाची बुद्धी ही देवदत्त बुद्धी असते म्हणजे देवाने दिलेली. त्यांच्या कृपेने मिळाली असे वाटले म्हणजे तो मायेच्या बाहेर राहतो.

16. परिस्थिती बदलली म्हणजे मी सुखी होईल असे वाटले तर. मला बदलण्याची गरज आहे असे म्हटले की तो मायेच्या बाहेर आहे.

17. अभ्यासापेक्षा यशाची काळजी वाटली तर

18. अनुभवापेक्षा शब्दज्ञान मोठे वाटले तर

19. सत्संगाचा प्रपंच झाला आणि तो आवडू लागला तर

20. प्रपंच गोड वाटायला लागला आणि तो करीत रहावा असे वाटले तर

मायेजवळ अनेक शस्त्र आहेत, कल्पना, पैसा, सत्ता, संचय, पुनरावृत्ती, अज्ञान, आसक्ती, भ्रम, अहंकार ह्या कोणत्याही शस्त्रांनी माया आपल्यावर घाला करू शकते.

पू. पेठे काका

जानकी जीवन स्मरण जय जय राम

कृपा करून मनात कोणाबद्दल द्वेष ठेवून हे जग सोडू नका.

पु. दत्ता काका

२६ जुलै २०२०

भक्ती म्हणजे नक्की काय? त्याच्या आड कोणत्या गोष्टी येतात ? भक्ती कशी करता येईल? योगमार्ग आणि भक्ती मार्ग मध्ये नक्की काय फरक आहे ? अनन्य भक्ताची लक्षणे काय आहेत ? भगवंत भक्तासाठी काय काय करतो? भगवंताचा अनन्य भक्त कोण होऊ शकतो? भक्त कशा पद्धतीने जीवन जगतो ?

भक्तियोग स्वाध्यायच्या चिंतनामधून आपण वरील प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. ह्यापैकी भक्तांची लक्षणे हि अमितच्या सगळ्याच स्वाध्यायमधून त्याने सुंदर explain करून सांगितलेली आहे . ज्ञानयोग आणि भक्तियोग ह्यातील फरक अमित ने पहिल्याच चिंतनात सांगितलेला आहे. त्यात थोडे addition करू या.

ज्याने सर्वसंगपरित्याग केलेला आहे, ज्याच्या मनात कोणतीही इच्छा उरलेली नाही त्याच्यासाठी ज्ञानयोग आहे. ज्ञानयोगसाठी मनाची अशी भूमिका (कोणतीही मनात इच्छा नसणे) तयार असावी लागते. ज्ञानयोग बुद्धीच्या जोरावर केला जातो. मी देह नाही, मी मन नाही, मी कोणत्याही पंचकोषात, पंचमहाभूतात नाही, भगवंत ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहे असा अनुभव घेत घेत शेवटी तो त्या निर्गुण रूपापर्यंत पोहचतो. पण श्री महाराज म्हणाले ह्या मार्गात अभिमान कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका जास्त आहे. प्रापंचिकांसाठी (ज्याच्या मनात अनेक इच्छा दडलेल्या असतात ) त्यांच्यासाठी भक्तियोग आहे. प्रापंचिकाला प्रेम करता येतं, एखादी गोष्ट मिळविण्याचा ध्यास तो धरतो, ती गोष्ट मिळाली नाही तर तळमळ निर्माण होते ह्या सगळ्या अनुभूती तो घेत असतो . फक्त ह्या सगळ्या अनुभूती तो विषय मिळवण्यासाठी करत असतो. भक्तियोगात हे विषयांचे प्रेम divert करून ते भगवंताकडे वळवण्याचा अभ्यास करायचा असतो.

श्रीमहाराज म्हणाले कि कोणत्याही मार्गाने पंढरपूरला गेले तरी सुद्धा विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी बारीतूनच प्रवेश करावा लागतो तसे ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो शेवटी तो एकाच ठिकाणी मिळतो. ज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्याच्या अंगी भक्ती उत्पन्न होते आणि भक्ताच्या हृदयी ज्ञान उत्पन्न होतं आणि त्याच्या मनातील सगळे संदेह मिटतात.

भगवंताचे दर्शन घडलेल्या अशा महापुरुषाचे अंतःकरण अतिशय स्वच्छ असते, अगदी आरशासारखे. जो कोणी आरशासमोर ऊभा राहील, मग तो कुरूप असो, देखणा असो, काळा, गोरा, उंच, बारीक, असा कोणताही भेद आरसा करत नाही. सगळ्यांना त्यांचे रूप त्या आरशात दाखवतो. कोणालाही रिजेक्ट करत नाही, आणि आरशासमोरून कोणी निघून गेले कि पुन्हा तो स्वच्छ होतो. कोणाचीही image store करून ठेवत नाही. स्वतःमध्ये काहीही साठवून ठेवत नाही. Mirror reflects everything, rejects nothing and retains nothing.

अमित ने सांगितलेली भक्तांची लक्षणे सगळ्याच सत्पुरुषांच्या, संतांच्या अंगी असतात. हे सगळे आपल्याला श्रीरामाच्या ठिकाणी पाहावयास मिळते. पु.पेठे काका म्हणले रामाला ला देव समजून त्याच्याकडे बघू नका, कारण देव समजले तर आपण त्याच्याकडून काहीच शिकू शकणार नाही. रामाला मनुष्य समजा(फक्त एवढ्यासाठी कि मग त्याच्याकडून आपल्याला शिकता येईल). ह्यापैकी पहिलेच जे भक्ताचे लक्षण सांगितलेले आहे अद्वेष्टा हे आपल्याला रामाकडून शिकण्यासारखे आहे. असे म्हणतात रामाने कधीही रावणाबद्दल वाईट उद्गार काढले नाही अगदी सीतेजवळ सुद्धा तो रावणाविषयी काहीही बोलला नाही. कोणतीही reaction व्यक्त केली नाही.

जानकी जीवन स्मरण जय जय राम


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099