३१ मे २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ सप्तदशोऽध्यायः – अध्याय सतरावा । ।
। श्रद्धात्रयविभागयोगः ।
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा । तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥ १ ॥
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला । तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ॥ २ ॥
म्हणौनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा । तर्ही हळु मायाजळा- । माजीं तारूनि ॥ ३ ॥
जे तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥ ४ ॥
दैविकी दिठी पाहतां सानी । तर्ही मीलनोन्मीलनीं । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥ ५ ॥
प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं । उठली मदगंधानिळीं । पूजीजसी नीलोत्पलीं । जीवभृंगांच्या ॥ ६ ॥
पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळली ते पूजा विधुळे । तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें ॥ ७ ॥
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ॥ ८ ॥
हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥ ९ ॥
फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्बंधु ऐसा भावो । धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगीं ॥ १० ॥
तंव दुजयाचेनि नांवें तया । देहही नुरेचि पैं देवराया । जेणें तूं आपणपयां । केलासि दुजा ॥ ११ ॥
तूंतें करूनि पुढें । जे उपायें घेती दवडे । तयां ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ॥ १२ ॥
जो ध्यानें सूये मानसीं । तयालागीं नाहीं तूं त्याचे देशीं । ध्यानही विसरे तेणेंसीं । वालभ तुज ॥ १३ ॥
तूतें सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणें । वेदांही येवढें बोलणें । नेघसी कानीं ॥ १४ ॥
मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तोत्रीं कें बांधों हाव । दिसती तेतुली माव । भजों काई ॥ १५ ॥
दैविकें सेवकु हों पाहों । तरी भेदितां द्रोहोचि लाहों । म्हणौनि आतां कांहीं नोहों । तुजलागीं जी ॥ १६ ॥
जैं सर्वथा सर्वही नोहिजे । तैं अद्वया तूतें लाहिजे । हें जाणें मी वर्म तुझें । आराध्य लिंगा ॥ १७ ॥
तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण । तैसें नमन माझें जाण । बहु काय बोलों ॥ १८ ॥
आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय ॥ १९ ॥
तैसा तुझिया प्रणितीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती । आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो ॥ २० ॥
तरी षोडशाध्यायशेखीं । तिये समाप्तीच्या श्लोकीं । जो ऐसा निर्णयो निष्टंकीं । ठेविला देवें ॥ २१ ॥
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥ २२ ॥
तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें । जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा ॥ २३ ॥
तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे । कैं नाकींचा केशु जोडे । सिंहाचिये ? ॥ २४ ॥
मग तेणें तो वोंविजे । तरीच लेणें पाविजे । एर्हवीं काय असिजे । रिक्तकंठीं ? ॥ २५ ॥
तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी । एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं ? ॥ २६ ॥
जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां । कैंचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥ २७ ॥
आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंही जें एकफळे ।तो उपावो कें मिळे । आघवयांसी ? ॥ २८ ॥
म्हणौनि शास्त्राचें घडतें । नोहें प्रकारें बहुतें । तरी मुर्खा मुमुक्षां येथें । काय गति पां ? ॥ २९ ॥
हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥ ३० ॥
तरी सर्वविषयीं वितृष्णु । जो सकळकळीं प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वें जो ॥ ३१ ॥
शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ॥ ३२ ॥
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥ ३३ ॥
अर्जुन उवाच ।
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः । तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १॥
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रियां फांवलिया ब्रह्मा ।तुझां बोलु आम्हा । साकांक्षु पैं जी ॥ ३४ ॥
जें शास्त्रेंवांचूनि आणिकें । प्राणिया स्वमोक्षु न देखे । ऐसें कां कैंपखें । बोलिलासी ॥ ३५ ॥
तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥ ३६ ॥
आणि अभ्यासीं विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाहीं आपैतिया । तिये वेळीं ॥ ३७ ॥
उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसें ठेलें आपादन । शास्त्राचें जया ॥ ३८ ॥
किंबहुना शास्त्रविखीं । एकही न लाहातीचि नखी । म्हणौनि उखिविखी । सांडिली जिहीं ॥ ३९ ॥
परी निर्धारूनि शास्त्रें । अर्थानुष्ठानें पवित्रें । नांदताति परत्रें । साचारें जे ॥ ४० ॥
तयां{ऐ}सें आम्हीं होआवें । ऐसी चाड बांधोनि जीवें । घेती तयांचें मागावे । आचरावया ॥ ४१ ॥
धड्याचिया आखरां । तळीं बाळ लिहे दातारा । कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥ ४२ ॥
तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयाचें जें आचरण । तेंचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥ ४३ ॥
मग शिवादिकें पूजनें । भूम्यादिकें महादानें । आग्निहोत्रादि यजनें । करिती जे श्रद्धा ॥ ४४ ॥
तयां सत्त्वरजतमां-/ । माजीं कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हां । सांगिजो जी ॥ ४५ ॥
तंव वैकुंठपीठींचें लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ॥ ४६ ॥
काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु । आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥ ४७ ॥
इयें श्लाघिजती जेणें बिकें । तें जयाचें आंगीं असिकें । तो श्रीकृष्ण स्वमुखें । बोलत असे ॥ ४८ ॥
No comments:
Post a Comment