अध्याय 1: अर्जुनविषादयोग(ज्ञानेश्वरी ओव्या ३८ ते ८४ )
श्रोता कसा असावा याचे निरुपण
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक । गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
श्रोता कसा असावा याचे निरुपण
आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक । गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥
भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें । तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ । ।
कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥
ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे । तैसें व्यासोक्ति तेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥
कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥
ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥
नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण । मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥
तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें । तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥
नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥
म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥
ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥
जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥
आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥
ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥
मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥
जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥
जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥
जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें । आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥ ६१ ॥
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥ ६२ ॥
हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥ ६३ ॥
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥ ६४ ॥
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळुं पाहें । तें अवधारा विनवूं लाहें । म्हणौनियां ॥ ६६ ॥
हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता ।
येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७ ॥
येर्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥ ६७ ॥
कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥ ६८ ॥
आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें । म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥ ६९ ॥
या गीतार्थानी थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥ ७० ॥
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥ ७१ ॥
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
ऐसे जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥ ७३ ॥
हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ? ॥ ७४ ॥
परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
येर्हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तर्ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥ ७६ ॥
लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥ ७८ ॥
जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणौनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥ ७९ ॥
तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असे ॥ ८० ॥
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१ ॥
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२ ॥
तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हे तुज बोलावें नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगां ॥ ८३ ॥
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४ ॥
सारांश - वरील ओव्यांचा आढावा
सारांश - वरील ओव्यांचा आढावा
मागच्या आठवड्यात आपण पाहिले की जनमेजय राजा हा महाभारताची कथा ऐकून ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाला , "व्याधीग्रस्त होशील" या शापातूनही मुक्त झाला.
माऊलीना इथे गीतेवर भाष्य करायचे आहे, गीता ही महाभारतात येते. म्हणून महाभारत आणि महर्षी व्यास यांचे ऋण ते सांगत आहेत. ते म्हणतात व्यासांनी महाभारत कथा लिहिली आणि हे विश्व बुद्धी आणि आनंद यांनी भरून गेले. "व्यासोच्छिष्ट जगत्रय" म्हणजे व्यासांनी सगळे सांगून ठेवले आहे. इथून पुढे झालेल्या सर्व लिखाणांमध्ये सर्व मूळ सिद्धांत हे व्यासांचेच आहेत.
माऊली महाभारताला सुंदर कमळाची उपमा देतात आणि गीता हे त्यातील परागकण. भुंगा हे परागकण अत्यंत हळुवारपणे सेवन करतो. तशी गीता ही तुम्ही हळुवारपणे अभ्यासा, त्यातले भाव जाणून घ्या, अर्जुन आणि भगवंत यांची भूमिका समजा आणि त्याचा अभ्यास करा. व्यासांनी सर्व वेद, उपनिषद, पुराणे सर्वांचा अभ्यास करून त्याचे सार गीता रूपाने आपल्या हातावर ठेवले आहे. जसे ताकातून लोणी काढून, ज्ञान व विवेक अग्नीवर ते कढवून त्याचे तयार तूप आपल्याला दिले आहे. तेंव्हा हे सिद्धांत कौशल्याने, प्रेमाने , स्थिर चित्ताने समजून घ्या. दासबोधमध्येही लिहिले आहे की आधी दासबोध समजून घ्या, आधीच टीकेला सुरवात करू नका. माऊली म्हणते अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रोते असतील त्यांनी कृपा करून लक्ष्य द्या आणि लगेच परिहार पण करतात कि हे मी सलगीने म्हणतो आहे. ते म्हणतात मी गीतार्थ कवळू पाहतो आहे, ते केवळ माझ्या सदगुरूंची कृपेमुळे. टिटविने स्वतःच्या चोचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा तसा माझा हा प्रयत्न आहे. हे तुम्ही गोड मानून घ्या.
स्वतः ब्रह्मदेव, शंकर आणि सनकादीक यांनीही गीतेची प्रशंसा केली आहे. शंकर हे गीतेचे ध्यान करतात, त्याबद्दल त्यांनी पार्वती मातेला सांगीतले आहे "गीता ही तुझ्या स्वरूपासारखीच नित्य आणि नूतन आहे " पार्वती ही कधी माता, कधी शक्ती, कधी स्मृती असते तसेच गीताही 5000 वर्षापूर्वीची असूनही आजही तितकीच नूतन आहे, नित्य आहे .गीतेतून नित्य नवीन अर्थ अभिप्रेत होतो. वेद हे भगवंतांच्या नि:श्वासातून, घोरण्यातून निर्माण झाले आहेत, गीता ही मुखातून निर्माण झाली आहे. पुढे माऊली नम्रपणे म्हणते यामध्ये तुम्हाला जे कमी वाटेल ते समजून घ्या, काही जास्त असेल ते काढून टाका. हे गीतार्थ सांगण्याचे धाडस मी माझ्या गुरूंची कृपा आहे, ते अनुकूल आहेत म्हणून करतो आहे.
आता इथून पुढे सुरु होणार पहिला अध्याय अर्जुनविषादयोग.अर्जुनाला नैराश्य आले, त्याने ऐन वेळेला शस्त्र टाकून दिले. म्हणून भगवंताला गीता सांगावी लागली. विषादामधून अर्जुन परमेश्वराशी जोडला गेला म्हणून याला विषादयोग म्हटले आहे .
खूप छान माहिती मिळाली काकू
ReplyDelete