अध्याय १८ : ओव्या १-८६

२५ जुलै २०२१ निरुपण 

अध्याय १८ ।  मोक्षसंन्यासयोग: । ज्ञानेश्वरी ओव्या  १-८६ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.  


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अश्टादशोऽध्यायः - अध्याय अठरावा । ।
। मोक्षसंज्ञासयोगः ।

जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥ १ ॥

जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ । निगमागमद्रुमफळ । फलप्रद ॥ २ ॥

जयजय देव सकल । विगतविषयवत्सल । कलितकाळकौतूहल । कलातीत ॥ ३ ॥

जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल । जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥ ४ ॥

जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ । नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत ॥ ५ ॥

जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ । भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस ॥ ६ ॥

जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद । शमदम\-मदनमदभेद । दयार्णव ॥ ७ ॥

जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प । भक्तभावभुवनदीप । तापापह ॥ ८ ॥

जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय । निजजनजित भजनीय । मायागम्य ॥ ९ ॥

जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो । स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी ॥ १० ॥

हे काय एकैक ऐसैसें । नानापरीभाषावशें । स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा ॥ ११ ॥

जिहींं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें ।हें जाणें मी म्हणौनि लाजें । वानणा इहीं ॥ १२ ॥

परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु । जंव न देखे सुधाकरु । उदया आला ॥ १३ ॥

सोमकांतु निजनिर्झरींं । चंद्रा अर्घ्यादिक न करी । तें तोचि अवधारीं । करवी कीं जी ॥ १४ ॥

नेणों कैसी वसंतसंगें । अवचितिया वृक्षाचीं अंगें । फुटती तैं हे तयांहि जोगें । धरणें नोहे ? ॥ १५ ॥

पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजें कवण ? । कां जळें शिवतलें लवण । आंग भुले ॥ १६ ॥

तैसा तूतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें । मग जाकळिला ढेंकरें । तृप्तु जैसा ॥ १७ ॥

मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण दवडूनि देशें । स्तुतिमिषेंच पां पिसें । बांधलें वाचे ॥ १८ ॥

ना येऱ्हवींं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी । तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कींंं ॥ १९ ॥
तरी तूं जी एकरसाचें लिंग । केवीं करूं गुणागुणीं विभाग । मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें ॥ २० ॥
आणि बाप तूं माय । इहीं बोलीं ना स्तुति होय । डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें ॥ २१ ॥
जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें ? । ऐसें उपाधी उशिटलें । काय वर्णूं ॥ २२ ॥
जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा । तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासी ॥ २३ ॥
म्हणौनि सत्यचि तुजलागींं । स्तुति न देखों जी जगीं । मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा ॥ २४ ॥
स्तुति कांहीं न बोलणें । पूजा कांहींं न करणें । सन्निधी कांहींंं न होणें । तुझ्या ठायीं॥ २५ ॥
तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । तैसें वानूं तें माऊली । उपसाहावें तुवां ॥ २६ ॥
आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावीं माझिये वाग्वृद्धी । जे माने हे सभासदीं । सज्जनांच्या ॥ २७ ॥
तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नको हें पुढतपुढती । परीसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळां कीजे गा । ॥ २८ ॥
तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो । तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां ॥ २९ ॥
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा । सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो ॥ ३० ॥
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे । आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये ॥ ३१ ॥
तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें । आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा ॥ ३२ ॥
मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवाइला बादरायणें । गीताप्रासादा ॥ ३३ ॥
नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं । तें सांगतसे गीता ही । संपलेपणें ॥ ३४ ॥
व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं । उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली ॥ ३५ ॥
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु । तो महाभारतप्राकारु । भोंवता केला ॥ ३६ ॥
माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट । घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी ॥ ३७ ॥
निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया । आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा ॥ ३८ ॥
ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा । भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला ॥ ३९ ॥
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो । सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये ॥ ४० ॥
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु । उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला ॥ ४१ ॥
म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये । तयांचें पुरें दाविताहे । आपुल्या आंगीं ॥ ४२ ॥
जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी । तेवींं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता ॥ ४३ ॥
ऐसा व्यासें विंदाणियें । गीताप्रासादु सोडवणिये । आणूनि राखिले प्राणिये । नानापरी ॥ ४४ ॥
एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया । एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची ॥ ४५ ॥
एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां । घेऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाच्या ॥ ४६ ॥
ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी । परी मोक्षप्रासादीं सरी । सर्वांही आथी ॥ ४७ ॥
समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें । तेवीं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे ॥ ४८ ॥
ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु । म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां ॥ ४९ ॥
आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी । तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा ॥ ५० ॥
का गंगायमुना उदक । वोघबगें वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणें ॥ ५१ ॥
न मोडितां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर । हें अर्धनारी नटेश्वर\- । रूपीं दिसें ॥ ५२ ॥
नाना वाढिली दिवसें । कळा बिंबीं पैसे । परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नाहीं ॥ ५३ ॥
तैसींं सिनानीं चारीं पदें । श्लोक तो श्लोकावच्छेदें । अध्यावो अध्यायभेदें । गमे कीर ॥ ५४ ॥
परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी । नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी ॥ ५५ ॥
मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे । परी शोभे रूप होये । एकचि तेथ ॥ ५६ ॥
फुलांफुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे । श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे ॥ ५७ ॥
सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख । परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं ॥ ५८ ॥

आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे । प्रस्तुत तेणें निर्वाहे । निरूपण आइका ॥ ५९ ॥
तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो । जें संपतां श्लोकीं देवो । बोलिले ऐसें ॥ ६० ॥
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं। बुद्धि सांडूनि आस्तिकीं । कर्मे कीजती तितुकींंंं । असंतें होतीं ॥ ६१ ॥
हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु । म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों ॥ ६२ ॥
तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा । तेथ नामचि एक पुढां । कां सुझे तया ॥ ६३ ॥
आणि रजतमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी । ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये ? । ॥ ६४ ॥
मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धावणें । सांडी पडे खेळणें । नागिणीचें तें ॥ ६५ ॥
तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे । दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं ॥ ६६ ॥
ना विपायें हें उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे । येऱ्हवीं येणेंचि जाये । निरयालया ॥ ६७ ॥
कर्मीं हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी । आतां कर्मठां कैं वारी । मोक्षाची हे ॥ ६८ ॥
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु । आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा ॥ ६९ ॥
कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोठी नाहीं । तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय ॥ ७० ॥
ज्ञानाचें आवाहनमंत्र । जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र । ज्ञान आकर्षितें सूत्र । तंतु जे का ॥ ७१ ॥
ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग । तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों ॥ ७२ ॥
ऐसें म्हणौनि पार्थें । त्यागसंन्यासव्यवस्थे । रूप होआवया जेथें । प्रश्नु केला ॥ ७३ ॥
तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टादशा ॥ ७४ ॥
एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे । आतां ऐका बरवें । पुसिलें जें ॥ ७५ ॥
तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें । जाणोनि अंतःकरणें । काणी घेतली ॥ ७६ ॥
येऱ्हवीं तत्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो राहे उगला । तें साहावेना ॥ ७७ ॥
वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी । अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे ॥ ७८ ॥
तेणें काजेवीणही बोलावें । तें देखीलें तरी पाहावें । भोगितां चाड दुणावे । पढियंतयाठायीं ॥ ७९ ॥
ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तंव तेचि मूर्ती । म्हणौनि करूं लाहे खंती । उगेपणाची ॥ ८० ॥
आणि संवादाचेनि मिषें । जे अव्यवहारी वस्तु असे । ते भोगिजे कीं जैसें । आरिसां रूप ॥ ८१ ॥
मग संवादु तोही पारुखे । तरी भोगितां भोगणें थोके । हें कां साहवेल सुखें । लांचावलेया ? ॥ ८२ ॥
यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस । मग उपलविलें दुस । गीतेंचें तें ॥ ८३ ॥
अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे । जैं वांसरुचि गाय दुहे । तैं वेळु कायसा ॥ ८४ ॥
तैसी संपतां अवसरीं । गीता आदरविली माघारीं । स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ? ॥ ८५ ॥
परी हें असो ऐसें । अर्जुनें पुसिजत असे । म्हणे विनंती विश्वेशें । अवधारिजो ॥ ८६ ॥

1 comment:

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099